Sex Trafficking survivor : सोशल मीडिया हे माध्यम जितके चांगले आहे तितके वाईटही आहे. मात्र, आपण स्वतःच या माध्यमातून काय चांगले घेऊ शकतो याकडे आपला अधिकतर कल असणे कधीही उत्तम. उपयुक्त माहिती, मानवी जीवनातील व्यथा, संघर्ष, रोखठोक भाष्य ते हळवी बाजू अशी प्रत्येक बाजू सोशल मीडियावर उत्तमरीत्या सादर केली जाते. आता तर अनेक कन्टेन्ट क्रिएटर आहेत जे संघर्ष, मानवी व्यथा, आणि हळवी बाजू लोकांसमोर मांडून एकप्रकारे त्यांना न्याय, आधार, दिलासा देण्याचं काम करतात. हो, हे सगळं बोलण्यामागचं कारण म्हणजे सध्या एका कन्टेन्ट क्रिएटरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, आणि या व्हिडीओला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. कन्टेन्ट क्रिएटर अनिश भगत याचे व्हिडीओ नेहमीच आशयघन असतात आणि प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात.
आताही अनिशचा मानवी तस्करीतून बाहेर पडलेल्या एका स्त्रीचा संघर्ष सांगणारा, तिची हळवी बाजू, तिचं दुःख मांडणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तब्बल पंधरा वर्षानंतर वेश्या व्यवसायाच्या दलदलीतून सुटलेल्या महिलेची संघर्षगाथा या व्हिडीओतून समोर आली आहे. वेश्याव्यवसाय हा प्रकार आजही आपल्या समाजात काही कमी झालेला नाही. गैरमार्गाने हा प्रकार सुरु असून यावर अनेक स्त्रिया आपल्या पोटा-पाण्याचा प्रश्न भागवतात, तर काही स्त्रिया इच्छा नसताना यात गुंतत जातात. अर्थात या सगळ्याला कारणीभूत आहे ती म्हणजे जबाबदारी. जबाबदारीचे ओझे आपल्याला या सगळ्यात ओढते. यातून सुटलेल्या एका महिलेला आता कसं वाटतंय, तिचं कुटुंब याला किती सहमत आहे, तिच्या या सगळ्यामागच्या भावना काय, एक स्त्री म्हणून तिला काय वाटत याचं अनिशने उत्तम सादरीकरण केलं आहे.
आणखी वाचा – आई तशी लेक! मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीचं चित्रपटसृष्टीत पदार्पण, म्हणाली, “मला प्रेम दिलंत तसं…”
अनिशने शेअर केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्याकडे शब्द नाहीत. एका वेदनादायी कथेचा मी साक्षीदार झालो. पंधरा वर्षांपूर्वी एका मुलीबरोबर अन्याय झाला. ती आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे लहानपणी वेश्याव्यवसायात बळजबरीने ढकलली गेल्यानंतर १५ वर्षांनी ती घरी पोहोचली. तिला वाटले आता तिला स्वीकारले जाईल मात्र समाजाच्या दबावाखाली तिच्या घरच्यांनी तिला स्वीकारले नाही”. अनिशचे हे कॅप्शन आणि व्हिडीओतील त्या स्कार्फ लावून चेहरा न दाखवणाऱ्या महिलेला या क्षणाला काय वाटत असेल याची कल्पनाही करवत नाही.
व्हिडीओच्या सुरुवातीला संबंधित महिला तिच्या कुटुंबाला भेटण्याची इच्छा अनिशकडे व्यक्त करताना दिसते. ती म्हणते, “मी गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या कुटुंबाला भेटलेली नाही. मला त्यांना पुन्हा भेटायचे आहे मी आता वेश्याव्यवसायातून बाहेर आले आहे. ते मला स्वीकारतील”, अशी आशा ठेवणाऱ्या त्या महिलेची इच्छा पूर्ण करण्यास अनिश तयार होतो. काही वर्षापूर्वीच तिच्या वडिलांचे निधन झाले. तिची आई गृहिणी आहे. तिच्या आईला साड्या आवडतात. म्हणून घरी जाण्यापूर्वी ती आईसाठी साडी घेताना दिसते. मोठ्या भावासाठी ती घड्याळ घेते, तो काय काम करतो याची तिला कल्पना नाही असंही ती प्रवासादरम्यान गप्पा मारताना अनिशला सांगते.
घराबाहेर गाडी लागताच ती महिला डोळ्यात पाणी आणून घराच्या दिशेने बोट दाखवत अनिशला स्वतःच्या घराची ओळख करुन देते. मात्र, ती अनिशला गाडीतच थांबायला सांगते आणि एकटीच घरी भेटून येते असं म्हणून जाते. मात्र, जेव्हा ती परतते तेव्हा तिचे डबडबले डोळे बरंच काही सांगून जातात. “आमच्यासारख्या महिलांबरोबर नेहमी हेच होतं हे तिचं वाक्य तिचा संघर्ष अधिक गडद करतं. त्यानंतर ती महिला अनिशच्या गाडीमध्ये बसून तिच्या कुटुंबाला पत्र लिहिते. ते पत्र आणि तिने आणलेल्या भेटवस्तू दाराबाहेर ठेवून ती मागे फिरते. आज जग कितीही पुढे गेलं असलं तरी आपण कुठेतरी मागासलेल्या विचारांचे राहिलो आहोत याची प्रचिती या व्हिडीओमधून येते. अर्थात सध्या हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट करत सहानुभूती दर्शविली आहे.