“बेटा तू ऑफिसला पोहोचलीस का गं?” बाबांनी मला हा एकच प्रश्न विचारायला फोन केला. मीही ट्रेनच्या गर्दीमधून आल्यामुळे “हो, आता ठेवा फोन” असं वैतागून त्यांना उत्तर दिलं. मी थेट फोनच कट केला. कामाला सुरुवात केली. अगदी दोन ते तीन तासांनी बाबांचा व्हॉट्सएपला मला एक मॅसेज आला. नेहमीप्रमाणे मी स्क्रिनवर नोटिफिकेशनला ते पाहिलं. पण मॅसेज काही उघडून पाहिला नाही. पुन्हा कामाला लागले. अर्धा तासाने बाबांचा फोन “काय गं जेवलीस का?”. “बाबा नाही हो कामात आहे आता पुन्हा तुम्ही मला फोन करु नका” असं उगाच मी पुन्हा त्यांच्याशी वैतागूनच बोलले. बरं काळजीपोटी बाबांचे असे फोन मला नेहमीच येतात. मग कधी गडबडीत असले की, होते चिडचिड तशी आज झाली. (emotional video viral on social media)
मग उगाच थोड्यावेळाने माझं मलाच वाईट वाटलं. बाबांवर वैतागून बोललो हे कुठेतरी खुपत होतं. पुन्हा फोन हातात घेतला. बाबांना फोन लावला. “बाबा थोडं वैतागूनच बोलले हा आज. मी जेवतेय तुम्हीही घ्या जेवून”, असं मी त्यांना म्हटलं. बाबांचं उत्तर आलं, “हो बेटा तुझी चिडचिड माझ्यावरच झाली ना काही हरकत नाही. पण हा मी पाठवलेला मॅसेज तेवढा आठवणीने बघ”. बाबा सारखंच का मॅसेज बघायला सांगतायत म्हणून मी कुतूहलाने व्हॉट्सएप उघडलं. डोळ्यासमोर त्यांनी पाठवलेला व्हिडीओ आला आणि रडूच लागले.
आणखी वाचा – बाळाला जन्म दिल्यानंतरची स्त्री कोणाला कळलीच नाही, सावरलं तिने स्वतःला पण…
बाबांनी मला पाठवलेला व्हिडीओ होता तो एका शहीद जवानाच्या लहान मुलाचा. त्या लहान मुलाने आपल्या बाबांसाठी एक पत्र लिहिलं होतं. त्या मुलाने पत्रात म्हटलं होतं की, “पप्पा मला माहित आहे तुम्ही आमच्याकडे बघत आहात. पण आम्ही तुम्हाला बघू शकत नाही. आता लवकर आम्ही तुमच्याशी खेळू शकत नाही. तुमच्याबरोबर फिरु शकणार नाही. तुमच्याकडे कधीच कसला हट्ट करणार नाही. तुम्ही आता सुट्टीला लवकर येऊ शकणार नाही. त्यादिवशी आम्ही तुम्हाला आगीमध्ये जाळलं. म्हणजे नक्कीच तुम्ही कोणत्यातरी मिशनवर असणार. हो ना…”.
“मी आणि अथर्व तुमची वाट बघून थकलो. मम्मी, आजोबा तुम्हाला फोन लावल्यासारखं करतात. पण तुम्हाला फोन लागत नाही असं मला सांगतात. मला माहितेय ते फोन लावत नाहीत. मामाचा फोन आल्यावर आम्ही मामाला पण सांगतो की, पप्पांना फोन करायला सांगा. मामा पण सांगतो फोन केला असता पण ते फोन उचलत नाहीत. पप्पा तुम्ही आल्यावर मम्मी, बाबा आणि आम्हाला सांभाळून घ्या. इथे सगळीकडे तुमचे फोटो लावले आहेत. किती मस्त ना इकडे सगळे तुम्हाला ओळखतात. घरी येऊन तुमच्याबद्दल बोलत असतात. म्हणून तुम्ही लपून काम करताय ना”.
आणखी वाचा – “लोक अक्कल शिकवतील की…”, लेकाचा व्हिडीओ शेअर करत शशांक केतकरची पोस्ट, शिक्षिकेसाठी पत्र अन्…
“मी पण मोठा झाल्यावर तुमच्यासारखाच होणार. बंदुकीने गोळ्या मारणार. पण माझ्याकडे बंदुकच नाही. तुम्ही येताना एक बंदुक घेऊन या आणि मला गोळ्या मारायला शिकवा. गोळ्या मारणं काय असतं हे तुमच्याकडून मी शिकून घेईन. मम्मी, हर्षद आणि माझी काळजी करु नका”. आपल्या बाबांसाठी त्या मुलाने लिहिलेलं ते पत्र काळीज पिळवटून टाकणारं होतं. क्षणभरात हा एकच विचार माझ्या मनात आला की, उद्या अचानक फोन करायला, मॅसेज करायला माझे बाबाच माझ्याबरोबर नसतील तर… माझ्या डोळ्यांतील पाणीच थांबेना. देशाची सेवा करताना त्या मुलाने आपल्या वडिलांना गमावलं. पण मला यामधून एक कळलं बाप आहे तोपर्यंत त्याला जपा, त्याला वेळ द्या. एकदा वेळ हातातून निघून गेली की, कितीही रडलात, कितीही आदळ-आपट केली तरी तुम्ही एकटे ते एकटेच राहणार तेही कायमचे…