आपल्या विनोदी अंदाजात प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवणारे कलाकार नेहमीच प्रेक्षकांच्या आठवणीत आणि स्मरणात राहतात. या आठवणीत राहणाऱ्या कलाकारांच्या यादीत असलेले एक नाव म्हणजे अभिजीत चव्हाण. मराठी मालिका तसेच अनेक चित्रपट आणि कॉमेडी शोज मधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात अभिजीतचा हातखंड आहे. आपल्या विनोदी अभिनयाने चर्चेत राहणारा अभिजीत सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच त्याने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तसंच या व्हिडीओमुळे अभिनेता नेटकऱ्यांच्याही कौतुकास पात्र ठरला आहे. (Abhijeet Chavan farming)
अभिजीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो हातात मशीन घेऊन शेतात काम करताना दिसत आहे. हातात मशीन घेत त्याने नांगरणी केली आहे. या खास व्हिडीओला त्याने ‘मशागत’ असं कॅप्शन दिलं आहे. शिवाय ‘लालबागचा’ बाबा असं हॅशटॅगदेखील वापरला आहे. या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी व कलाकारांनी कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. कुशल बद्रिकेनेदेखील या व्हिडीओवर त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि प्रत्येक नेटकऱ्यांच्या या कमेंट्सना अभिजीतनेही हटके उत्तरं दिली आहेत.
या व्हिडीओवर एकाने “चप्पल तरी काढ बाबा, अशी कोण शेती करते का?” अशी मजेशीर कमेंट केली आहे आणि याला अभिजीतने उत्तर देत असं म्हटलं आहे की, “मी करतो”. तर आणखी एकाने “सर कोंबडी तरी जास्त उकरते?” असं म्हटलं आहे. यावर अभिजीतने “म्हणून मी कोंबडी नाही” असं उत्तर दिलं आहे, तसंच आणखी एकाने “बाबा मशीन फिरवतो की मशीन बाबा ला फिरवते?” असा प्रश्न विचारला आहे, ज्यावर अभिजीतने त्याला “आम्ही लॉन्ग ड्राईव्ह ला पण जातो” असं हटके उत्तर दिलं आहे.
दरम्यान, अभिजीत चव्हाणने ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘कॉमेडी एक्सप्रेस’ आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अशा अनेक विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. तसंच त्याने अनेक चित्रपटांमधुनही त्याच्या अभिनयाची झलक दाखवली. त्याची युट्यूबवरील ‘स्ट्रगलर साला’ ही सीरिज अतिशय लोकप्रिय आहे. यात त्याच्याबरोबर कुशल बद्रिके व संतोष जुवेकरदेखील आहेत. नुकतीच त्याने ‘मुरांबा’ मालिकेत नकारात्मक भूमिका साकारली. ज्याचेही बरेच कौतुक झाले.