छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक असून याच मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते मिलिंद गवळी यांची एक वेगळीच फॅन फॉलोईंग आहे. मिलिंद गवळी यांनी आजवर अनेक मालिका व सिनेमे केले असले, तरी त्यांची ओळख ही अनिरुद्ध अशीच झाली आहे. तसा उल्लेख त्यांनी अनेकदा केलेला आहे. त्यामुळे मालिकेत मिलिंद जरी खलनायकी रूपात वावरत असले, तरी प्रेक्षक त्यांच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक करतात. (milind gawali)
अभिनेते मिलिंद गवळी हे त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से सोशल मिडीयावर शेअर करत असतात. नुकतंच त्यांनी ‘रेणुका आई लय भारी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना त्यांच्या आईचा भास कसा झाला, याचा किस्सा सांगताना ते भावुक झाले. मिलिंद गवळी यांनी या सिनेमाचा एक व्हिडिओ शेअर केला असून ज्यात ते म्हणतात, “‘आई रेणुका लय भारी’ या चित्रपटाचा शूटिंग कोल्हापुरात झालं, काही भाग रेणुका आईच्या यल्लम्मा मंदिरात, सौंदत्ती कर्नाटकमध्ये झाला. आणि या चित्रपटाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे अलकाताई कुबल यांनी या चित्रपटात सोशिक प्रतिमेच्या अगदी विपरीत अशी विलनची भूमिका केलेली आहे. या चित्रपटाचं आज वर्ल्ड प्रीमियर होणार आहे असं जेव्हा आमच्या प्रोड्युसराने सांगितलं, तेव्हा मला खूप छान वाटलं. मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो कारण चित्रपटात काम करण्याच्या निमित्ताने मला या अशा पवित्रस्थळावर जाण्याची संधी मिळाली आणि आई रेणुका यल्लमा देवीचे दर्शन छान पद्धतीने घेता येईल. माझी आई गेल्यानंतर जेव्हा जेव्हा मी येथे गेलोय तेव्हा तिथे मला माझ्या आईचा नेहमी भास होतो.” (milind gawali got emotional)
मिलिंद गवळींनी सांगितला चित्रपटातील शूटिंगचा किस्सा (milind gawali shares story during the film shoot)

“शूटिंगच्या दिवशी मी मेकअप करून मंदिरात पोचलो, रेणुका आईचं दर्शन घेतलं आणि शॉटसाठी वाट बघत होतो. मला आमचे डिरेक्टर म्हणाले “तुम्ही गाडीत बसा आमची तयारी झाली की तुम्हाला बोलवतो”. गाडीत बसून मनात विचार चालले होते की आज माझी आई असती आणि तिला कळलं असतं की मी रेणुका मंदिरात शूटिंग करतो आहे तर तिला खूप आनंद झाला असता. आणि काही क्षणातच एक गरीब म्हातारी बाई डोक्यावर एक टोपली घेऊन माझ्या समोर आली. ती कान्नडी भाषेमध्ये काहीतरी बोलायला लागली, ती काय बोलतेय हे मला काही कळलं नाही. मी पैसे काढून तिला द्यायला लागलो तर ती नाही पैसे नको आहेत असं म्हणाली. तिने टोपलीतून दोन भाकऱ्या काढल्या, त्याच्याबरोबर पिठलं आणि मेथीची भाजी त्या भाकऱ्यांवर ठेवली आणि त्या भाकऱ्या तिने मला दिल्या. अन म्हणाली ‘ईद्धनु तिन्नू’. ड्रायव्हर कानडी होता तो मला म्हणाला ‘आजी म्हणतात खाऊन घे’.”
“मी पैसे द्यायला लागलो तर आजी नको म्हणाली आणि भाकऱ्या देऊन निघून गेली. मी त्या मंदिराच्या परिसरात बसून त्या दोन्ही भाकऱ्या मनापासून खाल्ल्या. अनेक वर्ष हे स्मरणात राहिलेलं, आज संध्याकाळी सिनेमा जेव्हा लोकांसमोर येत आहे असं मला जेव्हा कळलं, तेव्हा पटकन ही गोष्ट डोळ्यासमोरून गेली आणि ती वयस्कर बाई जिने मला भाकरी दिली ती पटकन डोळ्यासमोर येऊन गेली. खरंच काही गोष्टी आपल्या आकलनाच्या पलीकडे, आपल्या बुद्धीच्या पलीकडच्या गोष्टी असतात. इतक्या वर्षानंतर “आई कुठे काय करते”चं यश आणि आजच्या दिवशी “आई रेणुका”च्या सिनेमाचं वर्ल्ड प्रीमियर. या दोघांमध्ये सामान्य घटक काय असेल तर ते आहे “आई” !”, अशी भावुक पोस्ट मिलिंद गवळी यांनी केली. (milind gawali got emotional)
मिलिंद गवळी यांचा ‘रेणुका आई लय भारी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी टीव्हीवर झळकला होता. या चित्रपटात त्यांच्यासह अभिनेते स्वप्नील राजशेखर व अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांचीही प्रमुख भूमिका होती. (renuka aai lai bhari movie)