गेल्या दोन-तीन वर्षात अनेक बॉलिवूड कलाकर लग्नबंधनात अडकले आहेत. काहीनी परदेशात जाऊन लग्न केले तर काही कलाकारांनी भारतातच लग्न करण्याचा निर्णय घेतला. बॉलिवूडमधील खूप चर्चेत राहिलेली जोडी म्हणजे आलिया भट्ट व रणबीर कपूर. इतर कलाकारांप्रमाणे कोणतेही डेस्टीनेशन वेडिंग न करता त्यांनी पाली हिल येथील घरी लग्न केले. छोटेखानी विवाहसोहळा पार पडला तरीही हे लग्न सुरक्षिततेच्या दृष्टीने तितकेच कठीण होते. आलिया व रणबीर यांच्या लग्नात कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला? याबद्दल सिक्युरिटी सीनियर कंसल्टन्ट यूसुफ इब्राहिम यांनी सांगितले आहे. ते या लग्नाबद्दल काय म्हणाले? हे आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया. (alia bhatt-ranbir kapoor security)
बॉलिवूड व आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या सेलिब्रिटीज यांची सुरक्षा बघणारे यूसुफ इब्राहिम यांनी नुकताच सिद्धार्थ कननशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आलिया व रणबीर यांच्या लग्नाचा किस्सादेखील ऐकवला. ते म्हणाले की, “आलिया व रणबीर यांच्या लग्नामध्ये सुमारे ३५० माध्यमांचे लोक आले होते. त्यावेळी सगळी सुरक्षितता बघणं खूप कठीण झालं होतं. माध्यमंचं नाही तर मोठ्या संख्येने त्यांचे चाहतेदेखील तिथे उपस्थित होते. त्यामुळे कोणीही पाहुणे आले रस्त्याच्या सुरुवातीलाच त्यांना आणायला जावे लागे”.
पुढे ते म्हणाले की, “पूर्ण पाली हिलवर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे या गर्दीमुळे बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना खूप त्रास सहन करावा लागला. त्यावेळी २०० बाऊन्सर्स असल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. मात्र तसं काहीही नसून माझ्या टीममधील ६० लोक होते आणि त्यांची आठ तासांची शिफ्ट होती. तसेच त्या इमारतीला केवळ एकच दरवाजा होता. त्यामुळे अधिक समस्या येत होत्या. एक दरवाजा त्यात खूप गर्दी यामुळे पाहुण्यांना गेटमधून आत पाठवणं खूप कठीण व्हायचं”.
नंतर त्यांनी सांगितले की, “या लग्नामुळे खूप गडबड सुरु होती. माझी टीम सहा दिवस सलग १८-१८ तास काम करत होती. अनेक पापाराजी भिंतीवर चढून फोटो काढण्याच्या प्रयत्नात असायची. मात्र टीमने सगळं अगदी व्यवस्थित सांभाळलं”. दरम्यान यूसुफ यांची ही मुलाखत मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.