Vandana Gupte In Punha Kartavya ahe : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत दाखविल्याप्रमाणे वसुंधरा व आकाश दोघांचेही दुसरे लग्न झाले आहे. मात्र लग्नानंतर वसुंधराला प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. असं असलं तरी लग्नानंतर वसुंधरा व आकाश दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. वसुंधराचा पहिला पती शार्दुलने मध्येच एंट्री घेत तिच्या आयुष्यात मोठा गोंधळ निर्माण केला. आणि यामुळेच वसुंधराविषयी घरच्यांच्या मनात आणि आपसूक आकाशच्या मनात गैरसमज निर्माण झाला होता. मात्र, सत्य समोर आल्यानंतर आकाश वसुंधराच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल्याचेही पाहायला मिळालं. यानंतर आता मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आला आहे. मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री झाली आहे.
‘झी मराठी’ वाहिनीने सोशल मीडियावर ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला एक महिला ठाकूर कुटुंबाच्या घरी येते आणि सांगते की, गुरुमाता संध्याकाळी येतील. त्यानंतर प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, जयश्री तनयाच्या खोलीत जाते. तेव्हा तनया तिला विचारते, “कोण आहेत त्या?”. यावर जयश्री म्हणते की, “ती येणार म्हणजे नसता ताप. एक नंबरची हट्टी आणि खडूस. सूनांना अशा-तशा सोडत नाहीत. एक चूक झाली की, कोप होतो”.
या प्रोमोमध्ये पुढे असं पाहायला मिळत आहे की, एक महिला गाडीतून उतरते. स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या घालण्यात आलेल्या असतात. वसुंधरा आरती ओवाळून त्यांचं स्वागत करते. घरातील इतर मंडळी म्हणजेच आकाश, तनया, आकाश, त्याचा मोठा भाऊ, जयश्री व आकाशचे वडील सर्वजण स्वागतासाठी उभे असलेले दिसतात. त्यानंतर जयश्री वसुंधराला पाणी आणण्यासाठी सांगते. वसुंधरा पाणी आणून गुरुमातेला देते. मात्र, वसुंधराने आणलेले पाणी पाहताच गुरुमाता रागाने म्हणते, “मी फक्त घरच्या सूनेच्या हातून पाणी घेते”. त्यानंतर जयश्री पाणी घेऊन येते. ते पाणी पाहून गुरुमाता म्हणतात, “किती अशुद्ध पाणी आहे”, आणि असं म्हणत त्या ग्लास जोरात जमिनीवर फेकतात.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “कोण आहेत या शीघ्रकोपी गुरुमाता…?”, असं कॅप्शन दिलं आहे. या गुरुमाता म्हणून मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांची एंट्री झाली आहे. बऱ्याच दिवसांनी वंदना यांना छोट्या पडद्यावर पाहून चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आता गुरुमाताच्या येण्याने मालिकेत कोणते बदल होणार याकडे अनेकांच्या नजरा वळल्या आहेत.