दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांचा ‘ओपनहायमर’ व ग्रेटा गेरविग यांचा ‘बार्बी’ या दोन बड्या हॉलिवूडपटांची जगभरात जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावर या दोन्ही चित्रपटांची तर आधीपासूनच चर्चा होती. पण जेव्हा हे दोन्ही सिनेमे सिनेमागृहात रिलीज झाले, तेव्हापासून या दोन्हींपैकी कोण बाजी मारणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली होती. आता या दोन्ही सिनेमांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले असून यातील एका सिनेमाने सध्यातरी बाजी मारल्याचे दिसत आहे. (Barbie Vs Oppenheimer box office collection)
‘बॅटमॅन : द डार्क नाईट’, ‘टेनेट’, ‘इंटरस्टेलर’ सारखे दर्जेदार सिनेमे देणारे दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांचा ‘ओपनहायमर’ व ग्रेटा गेरविग दिग्दर्शित व मार्गोट रॉबी हिचा अभिनय असलेला ‘बार्बी’ गेल्या आठवड्यात रिलीज झाल्यानंतर या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून जगभरातील बॉक्स ऑफिसमध्ये मात्र ‘बार्बी’ चित्रपटाने बाजी मारली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बार्बीने जगभरातून ४१.४ मिलियन अमेरिकन डॉलर्सची कमाई केली. तर ओपनहायमरने आतापर्यंत १५.७ मिलियन अमेरिकन डॉलर्सची कमाई केलेली आहे. विशेष म्हणजे, ऍडव्हान्स बुकिंगमध्ये ओपनहाइमरने बाजी मारलेली असताना व बार्बीपेक्षा जास्त शोज मिळालेले असतानाही सिनेमाची कमाईत झालेली घसरण, यावरून कोणत्या सिनेमाला प्रेक्षकांचा कल जास्त आहे हे कळून येत आहे.
पण भारतात आहे वेगळं चित्र… (Barbie Vs Oppenheimer box office collection in india)
एकीकडे जगभरात बार्बी घसघशीत कमाई करत असताना भारतात मात्र हे चित्र अगदी वेगळं आहे. भारतात ओपनहायमरने आतापर्यत १३ कोटींची कमाई केली असून बार्बीनं अवघ्या पाच कोटींची कमाई केली आहे. बार्बीपेक्षा ओपनहायमर कमाईत सरस असल्याचे दिसून येते. त्यामुळे भारतीय बॉक्स ऑफिसमध्ये तरी ओपनहायमरची जादू चालली आहे. असं असूनही बार्बीला मिळालेलं रेटिंगदेखील प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत असल्याने काही प्रेक्षक हे दोन्ही सिनेमे पाहण्यासाठी आतुरलेले आहे. (Barbie Vs Oppenheimer box office collection in india)
ख्रिस्तोफर नोलनचा हा सिनेमा रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावर आधारित असून सिलियन मुर्फी, रॉबर्ट डाउनी ज्यू, एमिली ब्लंट, फ्लोरेन्स पुग आदी मोठी नावं या सिनेमात आहेत. तर ग्रेटा गेरविग दिग्दर्शित बार्बीमध्ये मार्गोट रॉबी आणि रायन गोसलिंग हे मुख्य भूमिकेत आहेत. (Barbie Vs Oppenheimer)
