अभिनेता सुबोध भावे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सुबोधने आजवर त्याच्या अभिनय शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. विशेषतः तो सोशल मीडियाव बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो सोशल मीडियावरुन त्याच्या कुटुंबाबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसतो. अशातच सुबोधने शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचच लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडीओ सुबोधने त्याच्या प्रेमाची गोष्ट असल्याचं सांगत शेअर केला आहे. हा व्हिडीओ सुबोधने त्याची पत्नी मंजिरीसाठी बनवला आहे. (Subodh Bhave On wife)
३३ वर्षांपूर्वीचा सुबोध नेमका कसा होता हे या व्हिडीओतून समोर आलं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये सुबोध असं बोलताना दिसत आहे की, “नमस्कार, आज आमच्या सेटवरुन एक खास गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे. मी तुमच्या सगळ्यांसाठी नवीन, नाजूक, हळूवार रोमॅंटीक गोष्ट लवकरच घेऊन येत आहे. आजच्या दिवशी ही गोष्ट शेअर करावीशी वाटली कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज ६ मे आणि बरोबर ३३ वर्षांपूर्वी १९९१ साली मी मंजिरीला प्रपोज केलं होतं आणि तिने मला हो म्हटलं होतं”.
“मंजिरी आठवत आहे ना आणि कुठे हो म्हटलं होत हे आठवतंय का?. पुण्याच्या बालगंधर्वच्या पुलावर. आमची ही लव्हस्टोरी सुरु झाली मग त्याच्यानंतर तिचे काही वर्ष इथे असणं. मग अचानक कॅनडाला निघून जाणे. मग ती पत्र, चोरून पाठवलेली पत्र, मित्रांच्या नावाने पाठवलेली पत्र, त्यांची वाट बघण्यात गेलेले अनेक दिवस, मग हळूहळू इमेल्स आणि मग ४-५ वर्षाच्या विराहानंतर मंजिरी परत आली. आठवतंय का?”. पण खर सांगतो तुझ्याबरोबर त्यानंतर आयुष्यातल्या सगळ्या सुख दुखांच्या गोष्टी शेअर केल्या. तुझ्याबरोबरची प्रत्येक आठवण ही मात्र गोडच आहे आणि मंजिरी तू मला विश्वास दिलास की जगायला श्वासाची नाही प्रेमाची गरज असते”.
या व्हिडीओला कॅप्शन देत सुबोधने असं लिहिलं आहे की, “मंजिरी, ३३ वर्षांपूर्वी आपलं प्रेमाचं नातं खऱ्या अर्थाने सुरु झालं आणि ‘जगण्यासाठी श्वासाची नाही प्रेमाची गरज असते’, हे मला कळलं. आपली ही एक गोड आठवण आज मी तुझ्याबरोबर नव्याने शेअर करत आहे. पण जराशा हटके पद्धतीत. हा खास व्हिडीओ फक्त तुझ्यासाठी…”, असं त्याने म्हटलं आहे.