Yeu Kashi Tashi Me Nandayla actress : शिक्षणाला कोणतंही वय नाही. आज उच्च पदावर असलेल्या व्यक्तीही शिक्षण घेतात. तर मनोरंजन विश्वातील बरेच कलाकारही अभिनयाबरोबर आपली शिक्षणाची आवड जोपासतात. बरेचदा परदेशात जात ही मंडळी उच्च शिक्षण घेण्याकडे भर देतात. अशातच मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री काही वर्षांपासून मालिका विश्वापासून दूर जात परदेशात उच्च शिक्षण घेत आहे. आणि नुकतंच अभिनेत्रीने तिचं शिक्षण परदेशात पूर्ण केलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे अन्विता फलटणकर. बरेच दिवसांपासून अन्विता शिक्षणासाठी भारताबाहेर परदेशात राहत आहे.
टेलिव्हिजनवर ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अन्विता फलटणकर. या मालिकेतील अन्विताचे स्वीटू हे पात्र लोकप्रिय झाले. मुख्य अभिनेत्री म्हणून अन्विताची ही पहिलीच मालिका होती. या मालिकेत अन्विताबरोबर शाल्व किंजवडेकर मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला. मालिका संपल्यानंतर मात्र अन्विताने आपली पावलं शिक्षणाकडे वळविली. अभिनेत्री ऑस्ट्रेलियाला शिकायला गेली.
सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. विशेषतः अन्विता तिचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. परदेशातीलही अनेक व्हिडीओ, फोटो ती शेअर करते. अशातच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. ही आनंदाची बातमी म्हणजे तिने पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. या सोहळ्याचे फोटो अभिनेत्रीने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
आणखी वाचा – “काही जखमा कधीच भरुन निघत नाही”, वडिलांच्या आठवणीत अंकिता लोखंडे भावुक, म्हणाली, “जवळच्या व्यक्तीला गमावलं…”
अन्विताने ऑस्ट्रेलियातील ‘युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न’ मधून पदव्युत्तर पदवीच शिक्षण घेतलं. नुकताच तिचा दीक्षांत समारंभ पार पडला आणि तिने याचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. “मी माझी मास्टर्स डिग्री पूर्ण केली आहे”, असं म्हणत तिने फोटो पोस्ट केले आहेत. या खास समारंभासाठी अभिनेत्रीने खास राखाडी रंगाची साडी नेसली आहे. अन्विताच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळी आणि चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. सध्या अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.





