आमची पोर गेली, मारलं तिला, दोन मुलं कायमची पोरकी झाली, कोण बघणार आता त्यांना?, तिचा जीव का घेतला?…जळगावमधील गायत्री कोळीच्या कुटुंबियांचा एकच आक्रोश मन सुन्न करणारा होता. कारण होतं ते फक्त मासिक पाळी. माणूसकीला काळीमा फासणारी ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. जळगाव जिल्ह्याच्या किनोद गावात राहणाऱ्या गायत्रीने मासिक पाळी असताना घरात जेवण केलं. मात्र तिच्या सासूबाई व घरात असलेल्या नणंदांना मासिका पाळी असलेल्या स्त्रीने केलेलं जेवण जमत नव्हतं. फक्त याच विषयावरुन सुरु झालेला वाद आयुष्याच्या शेवटाकडे आला. गायत्री तिच्या राहत्या घरी गळफास घेतलेली दिसली. मात्र तिचा सासू व नणंदांनी खूण करुन फासाला लटकवलं असल्याचे आरोप कुटुंब करत आहे. (Women murder by mother in law sisters)
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नातेवाईक म्हणाले, “घर बांधण्याचं काम सुरु होतं. ते तिच्याकडे पैसे मागत होते. आम्हाला तिने दुपारी फोन केला होता. मायलेकी तिला सकाळपासून पैशांसाठी मारत होत्या. कपडे वर करुन करुन तिला मारत होते. मला पप्पांना घ्यायला पाठव असं ती बोलत होती. तिला मारुन टाकलं. पहिलं पोटात मारलं. तोंडावर मारलं. जीव घेतल्यानंतर फाशीला लटकवलं. एकदा ५० हजार तर एकदा २७ हजार घर बांधायला दिले होते. तरीही सारखं सारखं तिच्याकडे पैसे मागत होते”.
गायत्रीचा भाऊ सागर कोळी म्हणाला, “तिच्या सासूचा मला दुपारी फोन आला. त्या म्हणाल्या की, तुझ्या बहिणीनेच मला मारहाण केली आहे तिला इथून घेऊन जा. तिच्या तीन नंदा व सासू म्हणत होती तुझ्या बहिणीने आम्हाला मारहाण केली आहे. आता ती एकटीच चार जणांना कसं काय मारणार?. परत मला माझ्या बहिणीने फोन केला आणि मारहाण केल्याचं सांगितलं. घरी येण्यासाठी तिने बॅग वगैरे सगळं भरलं होतं. दूपारनंतर आम्हाला फोन आला की, तिने फाशी घेतली आहे. तिच्या सासूबाई आणि तीन नणंदा यांनीच तिला संपवलं आहे. तिचा नवराही यामध्ये सामिल होता. आता सगळेच फरार आहेत. घटनास्थळी आम्ही पोहोचलो तेव्हा घरी कोणच नव्हतं. शुल्लक कारणावरुन त्यांनी माझ्या बहिणीला मारलं”.
२१व्या शतकात जगत असताना मासिका पाळी जीव घेणारी ठरली? हे ऐकूनच संताप होतो. गायत्रीची दोन मुलं कायमची पोरकी झालीच. पण आई-वडिलांनी लेक, भावाने त्याची बहीण गमावली. हे दुःख न भरुन निघणारंच आहे. मासिक पाळीबाबत अजूनही काही घरांमध्ये अनेक समज-गैरसमज आहेत. या दिवसांमध्ये इथे हात नका लावू, हे नको करु ते नको करु म्हणून सतत स्त्रीला सूचना दिल्या जातात. पण मासिक पाळीमध्ये स्त्रीकडे माणूस म्हणून पाहिलं आणि माणूस म्हणून तिला वागणूक दिली तर अशा घटना कधीच घडणार नाही एवढंच…