Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व अनेक कारणांनी चर्चेत राहिले. कलाकारांचे आपापसात होणार वाद, घरातील काम, गॉसिप्स यामुळे यंदाचा सीझन चांगलाच गाजला. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’च्या घरात एक टास्क रंगला होता आणि या टास्कवेळी जान्हवी किल्लेकर आणि पंढरीनाथ (पॅडी) कांबळे यांच्यात मोठा वाद झाला. “पॅडी दादा आयुष्यभर अशी ओव्हर अॅक्टिंग करून थकले आहेत”, असे वक्तव्य जान्हवीने केले होते. तसंच तिने पॅडी यांचा जोकर म्हणूनही उल्लेख केला होता. जान्हवीने केलेले हे वक्तव्य घरातील सदस्यांना अजिबात आवडले नव्हते. त्यांनी यावरुन जान्हवीला विरोध केला होता. तसंच जान्हवीच्या या वक्तव्यावरुन सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनीदेखील संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले होते. (Paddy Kamble Wife Reaction)
पॅडी कांबळे यांची सहकलाकर व मैत्रीण विशाखा सुभेदार यांनीही त्यावेळी एक मोठी पोस्ट शेअर करत त्यांचा राग व्यक्त केला होता. पॅडी यांच्या या आपमानावर त्यांची मुलगी ग्रीष्मानेही पोस्ट शेअर केली होती. यावेळी पॅडी यांच्या पत्नीलाही वाईट वाटलं होतं. पॅडी यांच्या अपमानावेळी त्यांच्या पत्नीची काय प्रतिक्रिया होती. याबद्दल विशाखा यांनी सांगितले आहे. आठवड्यात पॅडी कांबळेंचा ‘बिग बॉस मराठी’मधील प्रवास संपला. त्यानंतर पॅडी व विशाखा यांनी ‘इट्स मज्जा’शी खास संवाद साधला. या संवादात विशाखा यांनी जान्हवीने पॅडी यांच्या केलेल्या अपमानावर त्यांच्या पत्नीची काय प्रतिक्रिया होती याबद्दल सांगितले आहे.
याबद्दल बोलताना विशाखा यांनी असं सांगितलं की, “त्यावेळी मी पॅडीच्या बायकोबरोबर बोलले. तेव्हा ती अगदी हिरमुसली गेली होती. तेव्हा मी तिला विचारलं की काय झालं? तेव्हा त्याची बायको असं म्हणाली होती की, तो नाटकाच्या दौऱ्यावर जायचा तेव्हा आम्ही कशा राहायचो हे आम्हाला माहीत आहे. तो जे पैशांचं पाकीट आणायचा, त्या पैशात आम्ही घर कसं चालवायचो हेही आम्हाला माहीत आहे. त्या नाटकांच्या दौऱ्यांच्या पैशांवर आम्ही आमचे घर चालवले आहेत आणि त्यावर आमचे संसार उभे केले आहेत आणि ही कोण कालची मुलगी आली आहे जी त्याला जोकर आणि ओव्हर अॅक्टर म्हणते. इंडस्ट्रीमध्ये तो स्लॅपस्टीकचा बाप म्हणून ओळखला जातो. परदेशात त्याचे अनेक चाहते आहेत. त्याच्यावर इतके लोक प्रेम करतात आणि त्याला ही बाई अशी कशी काय बोलली? याबद्दल तिला खूप वाईट वाटलं होतं”.
दरम्यान, जुलै महिन्यात ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला अगदी दणक्यात सुरुवात झाली होती. टीआरपीमध्येही हा कार्यक्रम अव्वल ठरला होता. तर नॉन-फिक्शन कार्यक्रमांमध्ये सर्वाधिक पाहिला जाणारा शो म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले गेले. अशातच आता हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. १०० दिवसांऐवजी ७० दिवसांत हा शो संपणार आहे. येत्या ०६ ऑक्टोबर रोजी या शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे.