काही दिवसांपूर्वी ठाण्यात मुक्या प्राण्यांच्या ग्रूमिंग सेशन सेंटरमध्ये कर्मचाऱ्याने एका श्वानाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. हा धक्कादायक प्रकार समोर येताच मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. अशातच नुकताच मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांचा आयपीएल सामना झाला. यावेळी सामन्यादरम्यान स्टेडियमवर एक कुत्रा धावताना दिसला. त्यामुळे काही लोकांनी त्या कुत्र्यांवर हल्ला केला.
‘स्ट्रीट डॉग्स ऑफ बॉम्बे’ च्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात आयपीएलमधील सुरक्षा व ग्राउंडच्या कर्मचाऱ्यांकडून कुत्र्यावर हल्ला होत असल्याचे पाहायला मिळत आहे. “माणसांप्रमाणेच प्राणीही आदर आणि दयाळूपणे वागण्यास पात्र आहेत. जे स्वत:साठी बोलू शकत नाहीत त्यांच्यासाठी बोलणे आणि अशा गैरवर्तनाच्या कृत्यांना शिक्षा होणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे” असं म्हणत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
यावर अभिनेता वरुण धवनने त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘स्ट्रीट डॉग्स ऑफ बॉम्बे’ च्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ वरुणने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे. वरुणने या व्हिडीओद्वारे स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांवर टीका करत असं म्हटलं आहे की, “हा काय मूर्खपणा आहे? कुत्रा हा काही फुटबॉल नाही. जर कुत्रा कोणाला चावत नाही, किंवा कोणतीही इजा करत नाही. तर त्याला बाहेर काढण्यासाठी आणखी चांगला मार्ग नव्हता का?”
आणखी वाचा – ‘रामायण’मधील राम म्हणजेच अरुण गोविल यांची वर्षभराची नेमकी कमाई किती?, भाजपामधून लोकसभा निवडणूकही लढवणार
दरम्यान, वरुण धवनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो आता समंध रुथ प्रभूबरोबर ‘सिटाडेल हनी बनी’मध्ये दिसणार आहे. याशिवाय ॲटलीच्या ‘बेबी जॉन’ या चित्रपटात तो एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. यात त्याच्याबरोबर अभिनेत्री वामिका गब्बी व कीर्ती सुरेश दिसणार आहेत.