बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. उर्वशीला हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल असल्याची बातमी समोर येत आहे. ती नंदामुरी बालकृष्णा यांचा तेलुगू चित्रपट ‘NBK 109’ चे शूटिंग करत आहे. या चित्रपटातील एका सीनदरम्यान ती जखमी झाली. उर्वशीच्या टीमने या बातमीला दुजोरा देत अभिनेत्रीला फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले आहे. उर्वशी रौतेला केवळ बॉलिवूडच नाही तर साऊथ चित्रपटसृष्टीमध्येही सक्रिय आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘JNU’ म्हणजेच ‘जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी’ या चित्रपटातही ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली. (Urvashi Rautela Admit)
‘फ्री प्रेस जर्नल’च्या वृत्तानुसार, उर्वशी रौतेलाच्या टीमने एक निवेदन जारी केले की तिला खूप वेदना होत आहेत आणि तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अभिनेत्री सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून तिच्यावर सर्वोत्तम उपचार केले जात आहेत. सध्या हैदराबादमध्ये ‘एनबीके 109’ या चित्रपटाचे शूटिंग सुरु असल्याची माहिती मिळाली. या चित्रपटातील जबरदस्त ॲक्शन सीन शूट करताना तिला दुखापत झाल्याचे समोर आले.
‘NBK 109’ चे शूटिंग नोव्हेंबर २०२३ मध्ये सुरु झाले. या चित्रपटात उर्वशीसह बॉबी देओल, प्रकाश राज आणि दुल्कर सलमान यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर साऊथ सुपरस्टार नंदामुरी बालकृष्ण मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक बॉबी कोल्ली सांभाळत आहेत. उर्वशी रौतेला याआधी अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेली पाहायला मिळाली. जेव्हा क्रिकेटर ऋषभ पंतचा अपघात झाला तेव्हाही अभिनेत्री प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्यानंतर अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचा फोटो पोस्ट केला होता. ऋषभ पंतलाही तेथे दाखल करण्यात आले होते.
उर्वशी रौतेलाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ‘एनबीके 109’ व्यतिरिक्त ती आता ‘दिल है ग्रे’ या चित्रपटात दिसणार आहे, ज्याचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. याशिवाय उर्वशीचा ‘ब्लॅक रोझ’ हा आणखी एक चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे, पण त्याबाबत काहीही अपडेट समोर आलेली नाही.