Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding : अभिनेता अक्षय कुमार व त्याची पत्नी ट्विंकल खन्ना नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. बरेचदा ट्विंकल खन्ना तिचा पती अक्षय कुमारला चिडवण्याची एकही संधी सोडत नाही. तिच्या मनात जे असेल ते थेट तोंडावरच बोलते. त्यामुळे बरेचदा ही जोडी चर्चेत आली आहे. अशातच आता पुन्हा एकदा ट्विंकलने अक्षयला एका गोष्टीवरुन फटकारले असल्याचं पाहायला मिळत आहे. अक्षयने अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्याला डान्स केला, ज्याची ट्विंकलने खिल्ली उडवली असल्याचं पाहायला मिळतंय. तिने म्हटलं की, “जणू काही तो जामनगरच्या मातीत तेलाची विहीर खोदत आहे”. ट्विंकलने तर अक्षयला हेदेखील सांगितले की, “तो एकच डान्स स्टेप ३३ वेळा रिपीट करत आहे”.
काही दिवसांपूर्वी अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा जामनगर येथे अगदी दिमाखात संपन्न झाला. ज्यामध्ये बॉलीवूडपासून ते क्रीडा व व्यावसायिक जगतातील दिग्गज व्यक्तींनी सहभाग घेतला होता. मुकेश अंबानी यांनी त्यांच्या धाकटा लेक अनंतच्या या कार्यक्रमासाठी पॉप गायक रिहाना आणि एकॉन यांनाही आमंत्रित केले होते. अगदी शाहरुख खान, सलमान खान व आमिर खान यांनी यावेळी एकत्र परफॉर्म केले. यादरम्यान अक्षय कुमार मागे कसा राहील?, अक्षयने यावेळी केवळ गाणे गायले नाही तर पंजाबी गाण्यावर जोरदार नृत्यही केले.

ट्विंकल खन्नाने हा सर्व परफॉर्मन्स इंस्टाग्रामवर पाहिला आणि टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राच्या कॉलममध्ये तिची प्रतिक्रिया शेअर केली. ट्विंकल खन्ना हिने अक्षयच्या डान्सचे वर्णन तेलाची विहीर खोदणे अशी केली आहे. तिने सांगितले की, “रिहानाचा परफॉर्मन्स नीता भाभी म्हणजेच नीता अंबानीच्या डान्सपेक्षा अर्धाही नव्हता, तरी तिने परफॉर्म करण्यासाठी ६६ कोटी रुपये घेतले”.
ट्विंकल खन्नाने पुढे लिहिले की, “मी पाहिले की तिन्ही खान (शाहरुख, सलमान आणि आमिर) एकत्र परफॉर्म करत आहेत आणि घराचा प्रमुख (अक्षय कुमार) एक दमदार गाणे गात आहे. त्यानंतर तो पंचिंग डान्स स्टेप करताना, ज्याने एकच डान्स स्टेप किमान ३३ वेळा केली. रंगमंचावरून तो जामनगरच्या मातीत आणखी एक तेलविहीर खोदणार आहे, असं वाटलं. मला असे वाटते की रिहानाने ज्या कामगिरीसाठी ६६ ते ७४ कोटी रुपये घेतले होते, ती नीता भाभींच्या विश्वंभरी स्तुतीच्या तुलनेत निम्मीही नव्हती, जी देवी दुर्गेचा अवतार माँ अंबेला समर्पित आहे”.