‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत येणाऱ्या रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेत सध्या अक्षरा आणि अधिपती यांच्यातील प्रेम फुलताना पाहायला मिळत आहे. अक्षरा व अधिपती यांच्यावरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अक्षरा-अधिपती यांच्या प्रेमाचा ट्रॅक सुरु असलेला पाहायला मिळत होता. दोघांनी एकमेकांसमोर प्रेमाची कबुली दिल्यानंतर ते प्रेमात आकंठ बुडालेले पाहायला मिळत आहेत. (Akshara Special Ukhana)
यंदाची वटपौर्णिमा अधिपती व अक्षरा यांच्यासाठी खूपच खास असणार आहे. वटपौर्णिमानिमित्त एक खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अधिपती व अक्षरा यांनी नुकतीच त्यांच्या नव्या नात्याला सुरुवात केली आहे. ‘वटपौर्णिमा विशेष गाणं’ प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘नवरा हाच हवा!’ या गाण्यात अक्षरा वडाची पूजा करून अधिपतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या गाण्यावर सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या जोडीदाराबरोबर या गाण्यावर ठेका धरलेला पाहायला मिळत आहे.
अशातच मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, पहिल्या वटपौर्णिमेची पूजा झाल्यानंतर गावातल्या काही महिला अक्षराला धरतात आणि अधिपतीसाठी उखाणा घ्यायला लावतात. अक्षरा त्या महिला नाकारत आता अचानक उखाणा कसा घेऊ असं म्हणताना दिसत आहे. यावर त्या महिलांपैकी एक महिला तुम्ही शिक्षिका आहात ना?, मग तुम्हाला यायलाच हवं. तुम्ही पटकन शब्दांची जुळवाजुळव करा आणि एखादा उखाणा घ्या, असं म्हणते.
सर्व महिलांच्या आग्रहाखातर अक्षरा अधिपतीसाठी उखाणा घ्यायला तयार होते. अक्षरा उखाणा घ्यायचा प्रयत्न करत म्हणते. “वडाला घालते प्रदक्षिणा सात, वडाला घालते प्रदक्षिणा सात, अधिपतीरावांचं नाव घेते लागू दे त्यांची जन्मोजन्मी साथ”, असा उखाणा ती यावेळी घेते. अक्षरा व अधिपती यांचं फुलणार नातं आता कोणतं वेगळं वळण घेणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे. सध्या मालिकेत अक्षरा व अधिपती घराबाहेर राहून साधेपणाने आपलं जीवन जगत आहेत. कष्टाचे जीवन जगत ते दिवस काढताना दिसत आहेत. अधिपती किराणा मालाच्या दुकानात ओझी वाहतानाही दिसला. घर चालवण्यासाठी तो कष्ट घेताना दिसत आहे.