‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. दमदार स्टारकास्ट आणि रंजक कथानकाच्या जोरावर या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली. या मालिकेतील अक्षरा-अधिपतीच्या जोडीला प्रेक्षकांनी लगेच आपलंसं करुन घेतलं आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत अक्षराची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारत आहे. तर, अधिपतीच्या भूमिकेत अभिनेता ऋषिकेश शेलार झळकत आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षराने आपल्या प्रेमाची कबुली दिली.
अधिपतीवर आपलं प्रेम असल्याचं तिने मान्य केलं आहे. त्यामुळे अक्षरा-अधिपती या दोघांमधलं नातं आता बहरतं आहे. त्यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मात्र या दोघांमध्ये आता भुवनेश्वरी अडथळा आणत आहे. वनेश्वरीने अधिपती-अक्षरा यांना घराच्या बाहेर काढले आणि त्यांना त्यांचा संसार करायला सांगितले आहे. यानंतर अधिपती व अक्षरा यांनी त्यांच्या नव्या संसारालाही सुरुवात केली आहे. पैशांसाठी ते काही ना काही प्रयत्न करत आहेत. अधिपती जास्त पैसे मिळण्यासाठी काहीतरी काम मिळालं पाहिजे असं म्हणत कुस्ती खेळतो आणि यात तो बक्षीसही मिळवतो आणि याच गोष्टीचा त्याच्या वडिलांना अभिमान वाटत आहे.
अधिपती आपल्या वडिलांना वडील म्हणून मानत नसला तरीदेखील चारुहासचे मात्र आपल्या लेकावर खूपच प्रेम आहे आणि नुकतीच त्याने कुस्तीही जिंकल्यामुळे त्याला लेकाबद्दल अभिमानही वाटत आहे. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला अल असून या प्रोमोमध्ये चारुहास अधिपतीबद्दल अभिमान वाटत असल्याचे म्हणत आहे. या प्रोमोमध्ये चारुहास आजीला असं म्हणतात की, “आपला मुलगा आपल्याशी कसाही वागो. पण बाहेर त्याने कर्तुत्व गाजवलं की बापाला आनंदच होणार. तसंच मला अधिपतीचा अभिमान वाटत आहे. कोल्हापुरच्या मुलांना हे कुस्ती, मैदान काय नवीन नाही. आम्हाला ते खेळावच लागणार. पण अधिपतीच्या बाबतीत एका वयानंतर हे मागेच पडलं. त्याला सराव नसतानाही तो कुस्ती खेळला आणि जिंकलंसुद्धा”.
दरम्यान, हा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असून या प्रोमोला चाहत्यांनी लाईक्स् व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या प्रोमोखाली अनेकांनी चारुहासचे कौतुक केलं आहे. बाप म्हणून त्याची भूमिका आवडत असल्याचे अनेकांनी कमेंट्सद्वारे म्हटलं आहे.