झी मराठी वाहिनीवरील सध्या सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. यापैकी तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मालिकेत सध्या अधिपती व अक्षरा यांच्या प्रेमाचा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अक्षराने अधिपतीला प्रेमाची मागणी घातल्यानंतर दोघांमधील प्रेम अधिकच फुलत आहे. अशातच लवकरच वटपौर्णिमा येणार असून मालिकेतही अधिपती व अक्षरा यांची वटपौर्णिमा साजरी होणार आहे.
यंदाची वटपौर्णिमा अधिक्षरा म्हणजेच अधिपती व अक्षरा यांच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरणार आहे. यानिमित्ताने एक खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अधिपती व अक्षरा यांनी नुकतीच त्यांच्या नव्या नात्याला सुरुवात केली आहे. यानिमित्ताने त्यांचं ‘वटपौर्णिमा विशेष गाणं’ प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘नवरा हाच हवा!’ या गाण्यात अक्षरा वडाची पूजा करून अधिपतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या गाण्यासाठी अधिपती व अक्षराने खास लूक केला आहे.
या गाण्यासाठी अक्षराने गडद निळ्या रंगाची अन् त्याला लाल रंगाचा काठ असलेली नऊवारी साडी परिधान केली आहे. तर या साडीवर साजेसा असा साजशृंगारही केला आहे. तिने गळ्यात पारंपरिक भरजरी दागिने घातले आहेत. केसात गजरा, हातात हिरवा चुडा, मंगळसूत्राचं हटके पेडंट अशा खास लूकमध्ये अक्षरा खुपचग सुंदर दिसत आहे. तर, अधिपतीने गडद गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान केला असून या कुर्त्याला सोनेरी रंगाची किनारही आहे. दोघेही ही लूकमध्ये अगदीच खास दिसत आहेत.
या गाण्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. गेले काही दिवस या दोघांमधील खास केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. अशातच या नवीन व्हिडीओमुळे चाहत्यांना आनंद झाला आहे, या व्हिडीओमधूनही अक्षराने पुन्हा एकदा अधिपतीला तिचं प्रेम व्यक्त केलं आहे. दरम्यान, या व्हिडीओला सध्या प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी हा व्हिडीओ आवडल्याचेही म्हटले आहे.