Zee Natya Gaurav Atul Parchure : आज अभिनेते अतुल परचुरे आपल्यात नसले तरी त्यांची आठवण आल्यावाचून राहत नाही. हरहुन्नरी कलाकार आज आपल्यात नाही याचं दुःख कायम आहे. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली. अतुल यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. मात्र, अतुल यांनी या गंभीर आजारावर मात करत सिनेविश्वात दमदार कमबॅक केलं. आणि त्यावेळी त्यांच्या जिद्दीचं साऱ्यांनी कौतुक केलं. अतुल यांच्या जाण्याने मनोरंजन क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली जी कधीच भरुन काढली जाणार नाही. तसेच त्यांचे निधन हे अनपेक्षित होते असेही त्यांच्या जवळच्या माणसांनी सांगितले होते. अशातच आता पुन्हा एकदा अतुल यांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.
‘झी नाट्य गौरव’च्या मंचावर अतुल परचुरेंसाठी स्वर्गाचे दार उघडणार आहेत. ‘झी नाट्य गौरव’च्या मंचावर अतुल परचुरे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. याचा खूप सुंदर आणि भावुक करणारा असा व्हिडीओ ‘झी मराठी’ वाहिनीच्या ऑफिशिअल पेजवरुन पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेते अतुल तोडणकर यांनी परचुरेंची भूमिका साकारत संवाद साधलेला पाहायला मिळत आहे. हा संवाद ऐकून उपस्थितांचेही डोळे पाणावलेले व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
व्हिडीओमध्ये ते असं बोलताना दिसत आहेत की, “येथे अजून सेटल झालो नाही. अजूनही सोनियाची, घरच्यांची, मित्रांची खूप आठवण येते. कधीकधी खाली जाऊन विचारावं वाटतं, मोन्या कसा आहेस रे?, तुझी खूप आठवण येते रे. त्या अंड्याला सांगा कुणीतरी म्हणावं आता तरी स्वतःचे किस्से सांग. बरं हा सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सगळे जमता ना पार्क क्लबमध्ये, तिथे तुमच्या गप्पा ऐकतो. भेटा रे. भेटत राहा. आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात”.
परचुरेंच्या तर्फे अतुल तोडणकरांनी केलेला संवाद सध्या लक्ष वेधून घेत आहे. इतकंच नाही तर हा संवाद ऐकून साऱ्यांना अश्रू अनावर झाले. तर हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट करत आठवणींना उजाळा दिला आहे.