purna aaji replacement : ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या अचानक निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला. वयाच्या ६९व्या वर्षी ज्योती यांनी अखेरचा श्वास घेतला. गेली जवळपास ५३ वर्ष ज्योती यांनी अभिनय विश्वात महत्त्वपूर्ण कामगिरी करत रसिकांच्या मनावर राज्य केलं. मराठी मालिका, चित्रपट, नाटक या तीनही माध्यमांत त्या बऱ्यापैकी सक्रिय होत्या. इतकंच नाही तर वयाच्या ६९ व्या वर्षी ज्योती सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असायच्या. त्याचे डान्स रील व्हिडीओ तर एखाद्या तरुणाईला लाजवतील असे असायचे. गेल्या अडीच वर्षांपासून त्या टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असलेल्या ठरलं तर मग या मालिकेतील पूर्णा आजी या भूमिकेमुळे लोकप्रिय झाल्या.
पूर्णा आजीच्या निधनानंतर मालिकेतील कलाकारांनी त्यांना भावनिक पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या अंत्यसंस्कारालाही मालिकेतील कलाकार मंडळी ढसाढसा रडताना दिसले. मालिकेत पूर्णा आजी आता दिसणार नाहीत याने प्रेक्षकांनाही धक्का बसला. ठरलं तर मग मालिकेत आता पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार हा प्रश्न साऱ्यांना सतावू लागला. तर अनेक चाहत्यांनी मालिकेत आता यापुढे पूर्णा आजीच्या भूमिकेत इतर कोणालाही पाहायला आवडणार नाही असं स्पष्ट म्हटलं. तर काहींनी मालिकेत पूर्णा आजी या पात्राला रिप्लेसमेंट देऊच नका असं म्हटलं.
‘ठरलं तर मग’ मालिकेचे ९०० भाग पूर्ण होणार असल्याने अमित भानुशालीने इन्स्टाग्राम लाइव्हवर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी “पूर्णा आजीची रिप्लेसमेंट कोण करणार आहे?” असा प्रश्न त्याला चाहत्याकडून विचारण्यात आला. यावर अमित भानुशाली म्हणाला, “तुम्हाला खरंच सांगतो, अजूनपर्यंत आम्ही कोणीच या गोष्टीचा विचारही केलेला नाही. आम्ही कोणीच या शॉकमधून बाहेर आलेलो नाही आहोत. त्यामुळे पुढे काय निर्णय घ्यायचा हे वरिष्ठ मंडळी ठरवतील. पण, इतकं सांगतो, आम्ही कोणीही कधीच पूर्णा आजीला विसरणार नाही आणि तिची जागा दुसरं कोणीही कधीच घेऊ शकत नाही.”
मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोखले म्हणाले, “तिची रिप्लेसमेंट होऊ शकत नाही आणि तिची जागा इतर कोणीही कधीच घेऊ शकत नाही… पण, हा एक शो आहे. याबाबत मालिकेच्या कथानकानुसार विचार केला जाईल. आम्हाला लवकरच जो काही निर्णय असेल तो कळेल”. यावर अर्जुन म्हणाला, बऱ्याच लोकांनी मला विचारलं पूर्णा आजीच काय?, तर त्यांना मला सांगायला आवडेल, पूर्णा आजी आहेत आणि नेहमी आमच्यासोबतच आहेत. त्या कधीच कुठेही गेल्या नाहीयेत”. त्यानंतर एका चाहत्याने विचारलं, पूर्णा आजी प्रेमळ आहेत का?”.
तर यावर अर्जुन म्हणाला, “ती खूप प्रेमळ होती. ती सेटवर येताना असं बास्केट भरुन खाऊ आणायची. तिच्या बास्केटमध्ये काय आहे याची आम्हाला उत्सुकता असायची, आम्ही विचारलं तर ती सांगायची हे बास्केट उघड आणि तुला हवं ते घे. आमच्यासाठी पुण्याहून येताना खास ती क्रीम रोल घेऊन यायची. जवळपास क्रीम रोलचे ८ ते १० बॉक्स तिने आमच्यासाठी आणायची. ती सगळ्यांसाठी खाऊ घेऊन यायची आणि तिला गोड खूपच आवडायचं. तिच्या असंख्य आठवणी आहेत त्यामुळे आम्ही पूर्णा आजीला कधीच विसरु शकत नाही”, असं अमित भानुशालीने सांगितलं.





