टेलिव्हिजनवरील ‘शक्तिमान’ ही मालिका आज इतके वर्ष उलटून गेली तरीही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. या मालिकेमध्ये शक्तिमानची भूमिका मुकेश खन्ना यांनी साकारली होती. तसेच त्यांनी महाभारत या मालिकेमध्ये भीष्म पितामह यांची भूमिका साकारली आहे. आजही ते प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. ते आता ६५ वर्षांचे आहेत. मात्र आजवर त्यांनी लग्न केले नाही. त्यांनी लग्न का केले नाही? असा प्रश्न अनेकदा चाहते त्यांना विचारतात. नुकताच त्यांनी आता याबद्दल खुलासा केला आहे. याबद्दलची पोस्टही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. (mukesh khanna on marriage)
मुकेश यांनी भीष्म पितामह या भूमिकेतील एक फोटोचा कोलाज शेअर केला आहे. तसेच या पोस्टवर लिहिले आहे की, “एक भीष्म प्रतिज्ञा कोणाचे लग्न थांबवू शकते का? लोकांना वाटते की माझ्याबरोबर असे झाले आहे. मी असा विचार करत नाही. लग्न म्हणजे दोन मनं एकत्र येतात. पण आजवर मला अशी व्यक्ती भेटली नाही. कदाचित भविष्यात मिळेल”.
पुढे त्यांनी लिहिले की, “लोकांना हे देखील वाटते की जितक्या अधिक गर्लफ्रेंड म्हणजे तुम्ही पुरुष आहात. पण असे नाही. लोकांना असेही वाटते की पत्नीने पतीव्रता असावे. पण पतीनेही पत्नीव्रता असावे. पण माझं लग्न भीष्म प्रतिज्ञेमुळे थांबले नाही हे मात्र नक्की”.
शक्तिमान या मालिकेमुळे मुकेश अधिक प्रकाशझोतात आले होते. आता यावर चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शक्तिमानची भूमिका अभिनेता रणवीर सिंह साकारणार आहे. मात्र यामुळे मुकेश खुश नसल्याचे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले होते. ते म्हणाले होते की, “केवळ प्रसिद्धीच्या जोरावर हे पात्र चालणार नाही. शक्तिमान असा सुपरहिरो आहे ज्याला भारतीय मूल्यदेखील असले पाहिजेत. तसेच शिक्षकाची झलक असणेही महत्त्वाचे आहे”. त्यांच्या या पोस्टची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. त्यामुळे आता ‘शक्तिमान’ चित्रपटात नक्की भूमिका कोण साकारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.