कलाक्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेता वैभव कुमार सिंह राघव गेल्या महिन्यांपासून कॅन्सरशी झुंज देत होता. सोमवारी (२ जून) वैभवची गंभीर आजाराशी सुरु असलेली लढाई संपली. त्याने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. २०२२मध्येच त्याला स्टेज ४चा कॅन्सर झाल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. त्यानंतर वैभव या आजाराचा अगदी हिंमतीने सामना करत होता. मुंबईतील नानावटी रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचारही सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्याच्या शरीराने साथ सोडली. वैभवला आणखी जगायची इच्छा होती. मात्र कॅन्सरने त्याच्या जगण्याची आशाच संपवून टाकली. आज वैभवच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आलं. (Actor Vibhu Raghav death)
वैभवचं जाणं त्याच्या इंडस्ट्रीतील मित्र मंडळींनाही अजूनही पचनी पडेना. तसेच त्याच्या कुटुंबियांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लेकाला शेवटचं पाहताना आईची अवस्था न पाहण्यासारखी होती. वैभवची आई ढसाढसा रडत होती. तिला कुटुंबातील मंडळी सांभाळत होती. मात्र लेकाला अगदी कमी वयात गमावणं आणि त्याचं दुःख एका आईच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं. वैभवला शेवटचं पाहण्यासाठी कलाक्षेत्रातील मंडळींनीही गर्दी केली होती.
वैभवच्या पश्चात त्याची आई अनुपमा राघव, भाऊ ऐश्वर्य राघव व बहीण गरिमा सिंह त्यागी असा परिवार आहे. सोशल मीडियाद्वारेही इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी वैभवबाबत पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली. तसेच त्याच्या जवळचा मित्र परिवार मोहित मलिक, मोहसिन खान, अनेरी वजानी, अंजली आनंद अंत्य संस्कारांसाठी उपस्थित होते. वैभवला शेवटचं पाहताना उपस्थितांचे डोळे पाणावले.
आणखी वाचा – “मला काय झालं तर कोण बघणार?”, ७९व्या वर्षीही एकट्याच राहतात उषा नाडकर्णी, परिस्थिती सांगताना रडू कोसळलं अन्…
इंडस्ट्रीतील बऱ्याच मंडळींनी वैभवला उपचारासाठी पैसे जमा करण्यास मदत केली. काही कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे वैभवला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. मात्र धडपड करुन, जगण्याची जिद्द असूनही वैभव ही लढाई हरला. टेलिव्हीजन विश्वात वैभवचं नाव मोठं होतं. निशा और उसके कजिन्स, सुवरीन गुग्गल, सावधन इंडिया सारख्या शोमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. त्याच्या भूमिकांमुळे वैभव घराघरांत पोहोचला.