Ustad Zakir Hussain Passed Away : देशाच्या कलाविश्वावर शोककळा पसरवणारी एक दु:खद बातमी समोर येत आहे ती म्हणजे प्रसिद्ध तबलावादक आणि ज्येष्ठ कलाकार उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन झाले आहे. उस्ताद झाकीर हुसेन यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवल्याची दुर्दैवी बातमी नुकतीच समोर आली आहे. उस्ताद झाकीर हुसेन गेल्या काही वर्षांपासून हृदयविकाराच्या आजाराचा सामना करत होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. (Ustad Zakir Hussain Passed Away)
उस्ताद झाकीर हुसेन यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना (रविवार १५ डिसेंबर)ला अमेरिकेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात झाकीर हुसेन यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयात दाखल केलं गेलं तेव्हा त्यांची प्रकृती गंभीर होती. झाकीर हुसेन लवकर बरे व्हावेत, यासाठी त्यांच्या चाहत्यांकडून प्रार्थनाही केल्या जात होत्या. पण या प्रयत्न व प्रार्थनांना अपयश आले असून झाकीर हुसैन यांनी जगाचा निरोप घेतला आहे.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री होणार आई, परदेशात पार पडलं डोहळ जेवण, खास फोटो व्हायरल
झाकीर हुसेन हे संगीत जगतातील एक मोठे नाव होतं. उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म १९५१ मध्ये मुंबईत झाला. झाकीर हुसेन हे जगातील महान तबलावादकांपैकी एक मानले जातात. भारतीय शास्त्रीय संगीतात त्यांचे योगदान मोठं आहे. झाकीर हुसैन यांच्या असामान्य प्रतिभेमुळे त्यांना गेल्या काही वर्षांत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. भारत सरकारने त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषणने सन्मानित केले.
आणखी वाचा – Pushpa 2 प्रीमियरला जखमी झालेल्या मुलाची प्रकृती अजूनही गंभीर, काय म्हणाले डॉक्टर?
झाकीर हुसेन यांना भारत सरकारने १९८८ मध्ये पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण, २०२३ मध्ये पद्मविभूषण यांसारख्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. झाकीर हुसेन यांना १९९० मध्ये संगीत नाटक अकादमीचा सर्वोच्च संगीत पुरस्कारही मिळाला होता. झाकीर हुसेन यांना ४ वेळा ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना त्यांच्या कारकिर्दीत ७ वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.