Suraj Chavan New Home : ‘बिग बॉस मराठी’ मुळे चर्चेत आलेला सूरज चव्हाण आता पुन्हा एकदा त्याच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आला आहे. येत्या २९ नोव्हेंबरला सूरज बोहोल्यावर चढणार आहे. आणि सध्या सर्वत्र त्याच्या लग्नाची धामधूम सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच्या लग्नाच्या शॉपिंगचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले. यानंतर आता सूरजच्या नव्या घराचीही गुडन्यूज पाहायला मिळाली. सूरजच्या नव्या घराचा अखेर गृहप्रवेश झाला आहे. आणि गृहप्रवेशावेळी सूरजने त्याच्या नव्या घराची झलक व्हिडीओ स्वरुपात दाखविली आहे. लग्नाआधी सूरजने त्याच्या नव्या घरात प्रवेश केला आहे. ‘बिग बॉस मराठी’चा विजेता झाल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी त्याला हक्काचं घर देण्याचं वचन दिलं. आणि यानंतर काही दिवसांतच त्याच्या घराचा भूमिपूजन सोहळा पार पडला.
यानंतर अखेर सूरजने लग्नाच्या आधी त्याच्या नव्या घरात प्रवेश केला आहे. यानंतर सूरजने त्याच्या घराची व्हिडीओ शेअर करत त्याखाली कॅप्शन देत असं म्हटलं की, “आज केला माझ्या नवीन घराचा गृहप्रवेश. आदरणीय अजितदादा पवार. फक्त तुमच्यामुळे माझ्यासारख्या एका सामान्य तरुणाला हक्काचे घर मिळाले. आपण नेहमी माझ्यासारख्या गोरगरीबाच्या मदतीला येता, यापुढे देखील असेच अनेकांच्या मदतीस याल अशी मला खात्री आहे. यात हस्ते परहस्ते मदत करणारेंचे देखील मनःपूर्वक आभार”.
सूरज चव्हाणच्या नव्या घराची झलक या व्हिडीओमध्ये दिसली असून यांत दोन मजल्यांचं आलिशान बंगला पाहायला मिळत आहे. घरात मोठ्या खिडक्या आहेत आणि हाय सीलिंग डिझाइन दिसत असल्यामुळे स्पेस अधिक खुला दिसत आहे. आत एक मोठा हॉल आहे. आणि मॉड्युलर किचन (स्वयंपाकघर) पांढऱ्या आणि आकाशी (ब्लू) टोनमध्ये डिझाईन केले आहे, जे खूपच आकर्षक दिसत आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घर बांधण्याचं वचन दिलं होतं, आणि त्यांनी स्वतः बांधकामाची पाहणी केली होती. आता या नव्या घरात गृहप्रवेश झाल्यानंतर सूरजने अजित दादा यांचे आभार मानले आहेत. या नव्या घराच्या बांधकामावेळी सूरजने स्वतः सिमेंटच्या गोण्या उचलून मदत केली. त्यामुळे त्याचा घर बांधण्याच्या कामात हातभार आहे असं म्हणता येईल.





