प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अनेक वाहिन्या वेगवेगळ्या विषयांच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. मालिकांच्या या शर्यतीत अव्वल स्थान मानलं जातं ते स्टार प्रवाह या वाहिनीचं. ‘आई कुठे काय करते’, ठरलं तर मग’, ‘प्रेमाची गोष्ट’ यांसारख्या मालिका निर्मित करुन स्टार प्रवाहने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी स्टार प्रवाह लवकरचं आणखी एक मालिका घेऊन येत आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही नवीन मालिका काही दिवसांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या मालिकेत ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रेश्मासह या मालिकेत बाळूमामांच्या भूमिकेमुळे घरोघरी पोहचलेला अभिनेता सुमित पुसावळे हा मुख्य नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. (Gharoghari Matichya Chuli Serial Cast)
‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत जानकी-हृषीकेश यांच्या आयुष्यात कुटुंबाचं असणारं महत्व अधोरेखित करण्यात आलं आहे. या नवीन मालिकेची पत्रकार परिषद नुकतीच पुणे येथील प्रसिद्ध ढेपे वाडा येथे आयोजित करण्यात आली होती. या वेळी ढोल ताशाच्या गजरात मालिकेतील कलाकारांचं जंगी स्वागत करण्यात आलं. पत्रकार परिषदेनंतर खास पारंपरिक पद्धतीत जेवणाची पंगत देखील आयोजित करण्यात आली होती. या पंगतीत जानकीने खास उखाणा घेत हृषीकेशला प्रेमाचा घास देखील भरवला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
जानकीने “ढेपेंच्या वाड्यात आज बेत आहे खास, हृषीकेशरावांना भरवते प्रेमाचा घास” असा सुंदर उखाणा घेत हृषीकेशला प्रेमाचा घास भरवला. रेश्मा-सुमितसह मालिकेतील अन्य कलाकार देखील या वेळी ढेपेवाड्यात उपस्थित होते. ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेची निर्मिती सोहम प्रोडक्शन अंतर्गत करण्यात येत असल्याने याप्रसंगी संपूर्ण बांदेकर कुटुंब देखील उपस्थित होतं. या वेळी बांदेकर कुटुंबाचं देखील जल्लोषात स्वागत करण्यात आलं. (Gharoghari Matichya Chuli Serial Cast)
मालिकेतील कलाकारांच्या, निर्मात्यांच्या आणखी एका कृतीचं प्रेक्षकांकडून कौतुक केलं जातंय. पत्रकार परिषदेसाठी आलेल्या पत्रकरांना स्वतः कलाकार व निर्मात्यांनी जेवण वाढत त्यांचं आदरातिथ्य केलं. तसेच स्वतः जेवायला बसताना कलाकारांनी ‘वदनी कवळ’ म्हणत जेवणाला सुरुवात केली हा व्हिडीओ देखील प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरतोय.