Shiva fame actress purva kaushik Fan Moment : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘शिवा’ ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेपैकी एक आहे. मालिकेत एकामागोमाग येणारी रंजक वळणे, अडथळे, संकटे यांमुळे मालिका पाहण्याची उत्सुकता वाढून राहिली आहे. मालिकेत शिवा ही भूमिका अभिनेत्री पूर्वा कौशिक साकारत आहे. पूर्वाने आजवर मालिका, नाटकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. मात्र शिवा मालिकेतील तिच्या शिवा या भूमिकेमुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे. सोशल मीडियावरही पूर्वा बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच पूर्वाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
पूर्वाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर चाहतीबरोबरचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये पूर्वा तिच्या चाहतीबरोबर दिसत आहे. थेट शिवा मालिकेचा सेट गाठत ही शिवाची चाहती तिला भेटायला आली आहे. चाहत्यांचे हे प्रेम कलाकारांसाठी त्यांच्या कामाची पोचपावती असते. त्यामुळे अनेकदा हे कलाकार चाहत्यांच्या नि:स्वार्थी प्रेमाने भारावून जातात. याप्रमाणे या चाहतीच प्रेम पाहून पूर्वा म्हणजेच सर्वांची लाडकी शिवाही भारावली आहे.
आणखी वाचा – आधी चाकूने आणि नंतर लोखंडी रॉडने वार अन्…; ‘क्राईम पेट्रोल’च्या ‘या’ अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला

व्हिडीओच्या सुरुवातीला पूर्वा असं म्हणताना दिसत आहे की, “आज आमच्या ‘शिवा’च्या सेटवर एक गोड व्यक्ती आली आहे. ती शिवाची चाहती आहे. तिचं नाव वृषाली आहे. तिला शिवा खूप आवडते, असं तिचं म्हणणं आहे. आणि ती उत्तम गाणं गाते”. त्यानंतर पूर्वा तिला विचारते की, “आज तू कोणतं गाणं गाणार आहेस?”. त्यावर वृषाली, “आज मी, ‘आपकी नजरों ने समजा’ हे गाणं गाणार आहे”, असे सांगते. त्यानंतर तिने गोड आवाजात “आप की नजरों ने समजा” हे गाणे गायल्याचे दिसत आहे. हा भावुक करणारा व्हिडीओ शेअर करत शिवाने लिहिले आहे की, “आज शिवाच्या सेटवर मी या खूप क्यूट चाहतीला भेटली. तिची भेट मनाला स्पर्शून गेली. शिवा आज खऱ्या अर्थानं जिंकली, असं वाटलं. मी भारावून गेले”.
‘शिवा’ या मालिकेत सध्या खूप मोठा ट्विस्ट आला आहे. मालिकेत शिवा तिच्या जून्या लूकमध्ये परतली आहे. आशूने घराबाहेर काढल्यानंतर शिवा तिच्या माहेरी परत आली आहे. आशूच्या मनात शिवाविषयी अनेक गैरसमज असल्याचं पाहायला मिळत आहे. हे गैरसमज शिवाची बहीण दिव्या व आशूची बहीण कीर्ती यांनी मिळून निर्माण केले आहेत. आता आशूच्या मनातील शिवाविषयीचे गैरसमज शिवा कशी दूर करणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.