शत्रुघ्न सिन्हा गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल आहेत. या बातमीने त्यांच्या चाहत्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शुक्रवारी (२९ जून) रात्री उशिरा सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसले. त्यांनतर झहीर इक्बालने वडील शत्रुघ्न सिन्हा यांची विचारपूस करण्यासाठी आल्याचा खुलासा केला. सूत्रांनी ‘एबीपी न्यूज’ला दिलेल्या माहितीनुसार शत्रुघ्न सिन्हा जुहू येथील त्यांच्या बंगल्यातील एका खोलीत सोफ्यावरुन उठताना पडले होते आणि त्यांना किरकोळ दुखापत व वेदना झाल्या होत्या. सूत्राने सांगितले की, दोन दिवसांनंतर त्यांना वेदना जाणवू लागल्यावर त्यांना तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. (Shatrughan Sinha Health Update)
शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर रुग्णालयात छोटीशी शस्त्रक्रिया झाल्याची चर्चा आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्या शस्त्रक्रियेच्या बातम्यांचे स्रोताने पूर्णपणे खंडन केले आहे. दरम्यान, एबीपी न्यूजशी बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हा याने वडिलांच्या प्रकृतीबाबतच्या सर्व अंदाज फेटाळून लावले आणि सांगितले की, “वडिलांना व्हायरल ताप आला होता आणि अशा परिस्थितीत आम्हाला त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आणि इतर सर्व प्रकारच्या चाचण्या करुन घेण्याचा सल्ला दिला”.
लवने असेही सांगितले की, “त्याच्या वडिलांची संपूर्ण शरीर तपासणी करण्यात आली आहे आणि डॉक्टरांनीही त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे”. लव म्हणाला की, “पप्पा आता बरे आहेत आणि उद्या त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल”.
शत्रुघ्न सिन्हा यांना २३ जानेवारी रोजी त्यांची मुलगी सोनाक्षीच्या नोंदणीकृत विवाह सोहळ्यात आणि रिसेप्शन पार्टीमध्ये शेवटचे दिसले होते. घरी पडून जखमी होण्याची ही घटना २५ जून रोजी घडली आणि त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच २७ जून रोजी शत्रुघ्न यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शत्रुघ्न सिन्हा यांनी काल भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषकाचा अंतिम सामना त्यांच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींबरोबर रुग्णालयातच पाहिला आणि हा विजय साजरा केला.