Bigg Boss Marathi season 5 : ‘बिग बॉस मराठी’ च्या पाचव्या पर्वाने साऱ्या रसिक प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. अल्पावधीतच हे पर्व इतकं गाजताना दिसत असून या पर्वातील प्रत्येक स्पर्धकाची चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. यंदाच्या या पर्वात अगदी पहिल्या दिवसापासून स्पर्धकांमध्ये तुफान राडे होताना पाहायला मिळाले. अगदी ‘बिग बॉस’च्या घरातील पहिल्या दोन दिवसांतच निक्की व वर्षा उसगांवकर यांच्यात वाद झाले. निक्कीकडून घरातील सर्वच स्पर्धकांचा अपमान होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता घरातील सदस्यही तिच्याशी वाद घालताना दिसले.
भाऊच्या धक्क्यावरही रितेश देशमुखने निक्की तांबोळीची शाळा घेतली. निक्कीला सर्व जनतेसमोर वर्षा यांची माफीही मागायला लावली. हे प्रकरण इतकं टोकाचं झालं की महाराष्ट्रातूनही निक्कीला बरंच ट्रोल केलं गेलं. निक्की पाठोपाठ जान्हवी किल्लेकरलाही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. जान्हवीचा उर्मटपणा, अरेरावीची भाषा ही साऱ्यांना खटकली. निक्कीच्या जीवावर उडणारी जान्हवीही ट्रोलिंगच्या कचाट्यात अडकली. उद्धटपणे केलेल्या वक्तव्यावर रितेशने जान्हवीलाही चांगलंच झापलं.
पहिल्या दिवसापासून जान्हवी व निक्की यांची वाईट वर्तणूक पाहून प्रेक्षकच नव्हे तर मराठमोळे कलाकारही तिच्यावर भडकले. ‘बिग बॉस मराठी’ सीजन १ ची विजेती मेघा धाडे ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. बरेचदा ट्रोलर्सच्या कमेंटवर ती सडेतोडपणे भाष्य करत ट्रोलर्सला उत्तरही देताना दिसते. ‘बिग बॉस’ मधील अनेक व्हिडीओवरही मेघाने प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळाली. अशातच ‘बिग बॉस’च्या घरात दोन नवे पाहुणे आल्यानंतर स्पर्धकांच्या भावनाशून्य वागणुकीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर मेघाने केलेल्या कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

“‘बिग बॉस’ तुम्ही या दोन पिसाळलेल्या कुत्र्या कुठून शोधून आणल्या?, यांना उपचाराची गरज आहे”, अशी कमेंट करत मेघा धाडेने निक्की तांबोळी व जान्हवी किल्लेकरला टॅग केलं आहे. जान्हवी व निक्कीची वागणूक आता साऱ्यांना खटकू लागली आहे. यावर मेघा धाडेने सडेतोडपणे भाष्य केलं आहे. याशिवाय प्रेक्षकांनीही दोघींना बाहेर काढा अशी मागणी केली आहे.