अलिकडे सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम समजलं जातं. या माध्यमाद्वारे जगभरातील माहिती मिळते. शिवाय जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधता येतो. प्रमोशन, ज्ञान, मार्केटिंग काय काय नाही होत या सोशल मीडियावर… पण हाच सोशल मीडिया जेव्हा विकृतीकडे वळतो तेव्हा काय होतं याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?. एखाद्यावर सहज चिखल फेक करण्यासाठी आज सर्रास सोशल मीडियाचा वापर होतो. हे चित्र अनेकदा कलाकार मंडळी अनुभवतात. एखादा व्हिडीओ, फोटो किंवा चित्रपट आला की, सोशल मीडियावर कलाकारांना टार्गेट केलं जातं. पण या क्षणभर ट्रोलिंगचा त्यांच्यावर काय परिणाम होत असेल याचा विचार कधी कोणी केलाय?. ट्रोलिंगला सणसणीत कानशिलात लगावणारी कविता आज सलील कुलकर्णी यांनी सादर केली. (Saleel Kulkarni song)
सलील कुलकर्णींची कविता ऐकाच
सलील यांनी त्यांच्या कवितेमधून ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे. नक्की ही कविता तुम्ही ऐका…
नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो
रोज वेगळं नाव लावून, लपून लपून भुंकीन म्हणतो
याच्यासाठी काही म्हणजे काही सुद्धा लागत नाही
कोणी इथे तुमच्याकडे डिग्री वगैरे मागत नाही
कष्ट नको, ज्ञान नको विषयाचीही जाण नको
आपण नक्की कोण कुठले याचे सुद्धा भान नको
खूप सारी जळजळ हवी विचारांची मळमळ हवी
दिशाहिन त्वेष हवा विनाकारण द्वेष हवा
चालव बोटे धारदार, शब्दांमधून डंख मार
घेरुन घेरुन एखाद्याला वेडा करुन टाकीन म्हणतो
नवीन डेटा पॅक दे रे अभाळावर थुंकीन म्हणतो…
खाटेवरती पडल्या पडल्या, जगभर चिखल उडव
ज्याला वाटेल, जसे वाटेल धरुन धरुन खुशाल बडव
आपल्यासारखे आहेत खूप, खोटी नावे फसवे रुप
जेव्हा कोणी दुबळे दिसेल, अडणीत कोणी असेल
धावून धावून जाऊ सारे, चावून चावून खाऊ सारे
जोपर्यंत तुटत नाही, धीर त्याचा सुटत नाही, सगळे मिळून टोचत राहू
त्याच्या डोळ्यात बोचत राहू, धाय मोकलून रडेल तो
धाय मोकलून रडेल तो, चक्कर येऊन पडेल तो
तेवढ्यात दुसरे कोणी दिसेल, ज्याच्या सोबत कोणी नसेल
आता त्याचा ताबा घेऊ, त्याच्यावरती राज्य देऊ
मग घेऊन नवीन नाव, नवा फोटो, नवीन डाव
त्याच शिव्या, तेच शाप, त्याच शिड्या, तेच साप
वय, मान, आदर, श्रद्धा सगळं खोल गाडीन म्हणतो
जरा उडले कोणी उंच, त्याला खाली पाडीन म्हणतो
थोडा डेटा खूप मजा, छंद किती स्वस्त आहे
एका वाक्यात खचते कोणी, फिलिंग किती मस्त आहे
नवा डेटा पॅक दे ना, आभाळावर थुंकीन म्हणतो…
पाहा व्हिडीओ
आणखी वाचा – खरंच घरात कुत्रा पाळणं योग्य आहे का?, तुमचं नक्की काय चुकतंय?
सलील यांनी कवितेचा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “कुठून येतात ही माणसं? कुठून येते ही वृत्ती? कोणाविषयीच आदर न वाटणारी ते एखादं वाईट वाक्य बोलतात…पण जो ऐकत असतो, त्याने ऐकलेलं त्या दिवसातले १० वे वाईट वाक्य असेल आणि त्याचा तोल ढळला तर?, तो जगण्यावर रुसला तर?, अशी भीती सुद्धा वाटत नाही ह्यांना?. या वृत्तीच्या माणसांच्या मनातल्या अंधारात डोकावून पाहायचा प्रयत्न करतांना ही कविता सुचली”. सलील यांच्या या कवितेला अनेक कलाकार मंडळींनीही प्रतिसाद दिला आहे.