मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये ज्या अभिनेत्रीचं नाव टॉपला येतं ती अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सईने फक्त मराठीमध्येच मर्यादित न राहता बॉलिवूडपर्यंत मजल मारली. हिंदी चित्रपटांमधील तिच्या कामासाठी पुरस्कारांनीही सईला सन्मानित करण्यात आलं. तिने रुपेरी पडद्यावर साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरल्या. कधी किसिंग सीनमुळे तर कधी बिकिनी लूकमुळे सई चर्चेचा विषय ठरली. सांगलीमधून तिचा सुरु झालेला प्रवास आज यशस्वी ठरला आहे. तिने अधिकाधिक मेहनत करत चित्रपटसृष्टीमध्ये यशाची पायरी गाठली. पण तरीही आजही बऱ्याचदा तिला अनेक नकारात्मक प्रश्नांनाही तोंड द्यावं लागतं.
सई सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे. पण त्याचबरोबरीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या परीक्षक पदाची धुरा ती सांभाळते. हे काम तिच्यासाठी अधिक जबाबदारीचं आहे. विनोदवीरांच्या कामाचं नीट निरीक्षण करायचं, प्रत्येक स्किटनंतर टिपणी द्यायची म्हणजे मोठी जबाबदारी. पण गेले काही वर्ष ती ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडते. पण यावरुन सईला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. याचबाबत तिने आता भाष्य केलं आहे.
“हास्यजत्रेमध्ये फक्त बसून हसायचं काम करते” असं सईबाबत नेहमी बोललं जातं. याचविषयी ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत सईला प्रश्न विचारण्यात आला. यावेळी तिने अगदी सडेतोड उत्तर दिलं. “सई-प्रसादला हास्यजत्रेमध्ये बसून फक्त हसायचं काम असतं असं बोललं जातं. तर तुम्ही नेमकं कशाप्रकारे काम करता हे लोकांना सांग” असं सईला मुलाखतीत विचारण्यात आलं. यावेळी तिने कामाची संपूर्ण प्रक्रिया सांगितली.
सई म्हणाली, “असं म्हणणाऱ्यांना मी फक्त एवढंच सांगेन की, आमच्या खुर्चीमध्ये बसून प्रत्येक स्किटनंतर कमेंट देऊन बघा. आम्हाला स्क्रिप्ट दिलेली नसते. आम्हाला काय बोलायचं हेही सांगितलेलं नसतं. आम्हाला किती बोलायचं हेसुद्धा सांगितलेलं नसतं. आम्हाला काय बोलायचं नाही हेही सांगितलेलं नसतं. हे करुन बघा आणि तुम्हाला जमलं तर या. आणि आमच्या खुर्चीवर बसा”. सईने अगदी शांतपणे पण थेट उत्तर दिलं. यामधून प्रसाद, सई ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’साठी किती मेहनत करतात हे दिसून आलं.