Aparna Kanekar Death : ‘साथ निभाना साथिया’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री अपर्णा काणेकर यांचे निधन झाल्याने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ८३व्या वर्षी ‘साथ निभाना साथिया’मधील जानकी बा मोदीची भूमिका साकारणाऱ्या अपर्णा यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. जानकी बा ही त्यांची भूमिका विशेष गाजली होतो. अपर्णा काणेकर यांच्या आकस्मिक निधनाने मालिकाविश्वातील कलाकारांना आणि चाहत्यांनाही धक्का बसला आहे.
अपर्णा काणेकर यांच्या निधनाची बातमी यांची सहकलाकार लवली सासन यांनी दिली. लवली सासन या अपर्णा यांच्या खूप जवळच्या होत्या. त्यांच्या आकस्मिक निधनाने तिला धक्का बसला आहे. अपर्णा काणेकर यांची आठवण काढत लवली यांनी त्यांच्याबरोबरचा एक सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोसह लवली यांनी खूप छान असं कॅप्शनही दिलं आहे.
लवली यांनी म्हटलं आहे की, “आज माझं मन खूप भरुन आले आहे, कारण माझ्या सर्वात जवळच्या आणि खऱ्या लढवय्याचे निधन झाले. बा, तू माझ्या ओळखीची सर्वात सुंदर व खंबीर व्यक्ती होतीस. सेटवर आपण एकत्र, कायम लक्षात राहील असा वेळ घालवल्याबद्दल मी खरोखर आभारी आहे, हा वेळ मी कधीच विसरणार नाही. माझी प्रिय, तुझ्या आत्म्याला शांती लाभो. प्रत्येकजण तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझी खूप आठवण येईल. तुझा वारसा सदैव जिवंत राहील.”
‘साथ निभाना साथिया’ मालिकेतील कलाकार अपर्णा यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दुःखी आहेत. वास्तविक, ‘साथ निभाना साथिया’च्या कलाकारांनी त्यांच्या मालिकेतील एक लाडका सदस्य गमावला आहे. सोशल मीडियावरून या कलाकारांनी त्यांच्या सहकलाकाराच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. देवोलिना भट्टाचार्जी आणि मोहम्मद नाझिम ते तान्या शर्मापर्यंत ‘साथ निभाना साथिया’ची संपूर्ण टीमला धक्का बसला आहे.
अपर्णा यांच्या निधनाबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला. अपर्णा ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतील जवळपास सर्वच कलाकारांच्या जवळच्या होत्या. सर्वांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. २०११ मध्ये, अपर्णा ‘साथ निभाना साथिया’ मध्ये जानकी बा म्हणून सामील झाल्या, आणि अल्पावधीतचं त्या आवडत्या अभिनेत्री झाल्या. अपर्णा काणेकर सुमारे पाच वर्षे फ्रीलान्सर म्हणून काम करत होत्या.