सध्या जगभरात आयपीएलची क्रेझ असलेली पाहायला मिळत आहे. सर्वच क्रिकेट प्रेमी वेळात वेळ काढून आयपीएल पाहताना दिसतात. सोशल मीडियावरही आयपीएल संदर्भात अनेक पोस्ट, व्हिडीओ शेअर केले जात आहेत. अशातच आता एका क्रिकेटरच्या मुलाखतीदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. (Rohit sharma Emotional)
आजवर कपिल शर्माच्या शोमध्ये अनेक कलाकार मंडळी, राजकीय मंडळी यांनी हजेरी लावत या कार्यक्रमाची शोभा वाढवली. मात्र आता दोन क्रिकेटर्स कपिलच्या या नव्या कार्यक्रमात सहभागी झालेले दिसले. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना पाहायला मिळतात. या शोच्या पहिल्याच भागात रणबीर कपूर त्याच्या कुटुंबासह हजेरी लावताना दिसला. आता या शोच्या दुसऱ्या भागात भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर हे दोन खेळाडू सहभागी झालेले पाहायला मिळाले. नुकताच या कार्यक्रमाचा एपिसोड प्रदर्शित करण्यात आला आहे. दरम्यान रोहितने या कार्यक्रमात वर्ल्डकपदरम्यानच्या जुन्या आठवणींना उजाळा दिलेला पाहायला मिळाला. यावेळी त्यांना वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवावर भाष्य केलं. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्याबद्दल रोहितने यावेळी दुःख व्यक्त केलं. या आठवणी सांगताना रोहित थोडासा भावुक झाला.
रोहित म्हणाला, “वर्ल्डकप अंतिम सामन्याच्या बरोबर दोन दिवस आधी आम्ही अहमदाबादला पोहोचलो. टीममधलं वातावरण अतिशय आनंदी होतं. आम्ही अंतिम फेरीतसुद्धा चांगली सुरुवात केली होती. शुभमन आधी बाद झाला. परंतु, जेव्हा तुम्ही अंतिम सामना खेळत असता, तेव्हा मोठी धावसंख्या उभारावी लागते. जेणेकरुन प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण होईल. गिल बाद झाल्यावर मी आणि विराटने भागीदारी केली. पण, ऑस्ट्रेलिया या लढाईत आमच्यापेक्षा एक पाऊल पुढे होती. त्यांनी उत्तम खेळ खेळाला. त्यांच्या खेळाडूंनी उत्तम पार्टनरशीप देखील केली. मला वाटलं वर्ल्डकप भारतात होऊनही आपण हरलो त्यामुळे आज संपूर्ण देशातील चाहते आमच्यावर रागावले असतील. पण, लोकांनी आम्हाला सांभाळून घेतलं. आमचं कौतुक केलं”, असं म्हणत तो भावुक झाला.
बाप-लेकीचं अनोखं नातं! श्रेयस तळपदेचं लेकीबरोबर आहे खास बॉण्डिंग, बायकोने फोटो शेअर करताच दिसली झलक
रोहितने सांगितलेल्या वर्ल्डकपच्या आठवणी ऐकून कार्यक्रमादरम्यान उपस्थित असलेल्या सर्व उपस्थितांनी उभे राहून टाळ्या वाजवत त्याचं कौतुक केलं. या शोची जज अर्चना पुरण सिंगने उभं राहून टाळ्या वाजल्या आणि त्याचं कौतुक केलं. ती म्हणाली, “तुम्ही वर्ल्डकप जिंकलात किंवा हरलात यापेक्षा महत्त्वाचं आहे ते म्हणजे सगळ्या खेळाडूंनी आमची मनं जिंकली आहेत”.