Aastad kale on vaishnavi hagawane death case : वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे महाराष्ट्रभरात संतापाची लाट आहे. या प्रकरणाबाबत आता पोलिस कसून चौकशी करत आहेत. संपूर्ण हगवणे कुटुंबियांनाच पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे काही दिवसांपासून फरार होते. अखेरीस शुक्रवारी पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. यामुळे या हुंडाबळी प्रकरणाने आता वेग धरला आहे. दिवसागणिक वैष्णवीच्या आत्महत्येबाबत विविध माहिती समोर येत आहे. हगवणेंची मोठी सून मयुरी जगतापनेही अनेक धक्कादायक खुलासे केले. याबाबत आता सगळ्याच स्थरातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. सुप्रसिद्ध मराठी अभिनेता आस्ताद काळेनेही पोस्ट शेअर करत त्याचं मत मांडलं. (vaishnavi hagawane death case)
हगवणे कुटुंबियांनी वैष्णवीला मारहाण, शिवीगाळ व शारीरिक छळ करत अक्षरशः संपवलं. वैष्णवीने हा संपूर्ण प्रकार तिच्या माहेरीही सांगितला. आई-वडिलांनी लेक सासरी सुखाने राहावी म्हणून अनेक प्रयत्न केले. इतकंच काय तर वैष्णवीच्या सासू-सासऱ्यांचे पायही धरले. लेकीचा संसार सुखाने व्हावा म्हणून केलेली ही धडपड होती. मात्र हुंडा देणं आणि तो स्वीकारणं हाच मोठा गुन्हा आहे हे सातत्याने समोर आलं आहे. हुंडा देऊन वैष्णवीच्या आई-वडिलांनी मोठी चूक केली अशा प्रतिक्रिया आता सातत्याने समोर येत आहेत.
आणखी वाचा – हगवणे कुटुंबातील खरी व्हिलन नक्की करते तरी काय?, नणंदच दोन्ही भावजयांसाठी ठरली राक्षस
आस्तादनेही वैष्णवीच्या आई-वडिलांचीच चूक आहे असं म्हटलं आहे. हुंडा दिला नसता तर प्रकरण इथपर्यंत आलंच नसतं असं कित्येकांचं म्हणणं आहे. आस्ताद म्हणाला, “संपूर्ण कुटुंबाला जनतेच्या विशेषतः स्त्रियांच्या हाती द्यायला हवं. हुंडा मागणाऱ्या हलकटांच्या मनात दहशत बसली पाहिजे. कायदा हा माणसांसाठी असतो. हैवानांसाठी नाही”. आस्तादने हगवणे कुटुंबियांना योग्य ती शिक्षा मिळावी म्हणून पोस्ट शेअर केली. तसेच कठोर कारवाई करत संपूर्ण कुटुंबाला जनतेच्या हाती द्यावं अशी मागणीही आस्तादने केली.
त्यानंतर आस्तादने आणखी एक पोस्ट शेअर केली. तो म्हणाला, “आपल्या मुलींच्या परिस्थितीबाबत, अवस्थेबाबत आई-वडिलांना किंवा कुटुंबियांना काहीच माहित नसतं?. की माहिती असूनही हे कोणी पाठिंबा देत नाहीत?. तसं असेल तर हे माहेरचेदेखील तेवढेच दोषी आहेत ना?”. एकूणच काय तर वैष्णवीच्या माहेरी म्हणजे कस्पटे कुटुंबियांना आधीच सगळं माहिती असूनही त्यांनी अत्याचार सहन केला. वैष्णवीला सगळं सहन करायला लावलं. अवघ्या विशीतच कस्पटेंना त्यांची लेक गमवावी लागली हे दुर्देवच…