मराठी अभिनेता प्रसाद ओकने गेली अनेक वर्ष आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नाटक, मालिका, चित्रपट या सर्वच माध्यमातून त्याने उत्कृष्ट अभिनय साकारला आहे. अभिनयाबरोबर दिग्दर्शन क्षेत्रातही तो आपलं नशीब अजमावत असून त्याने दिग्दर्शित केलेला ‘चंद्रमुखी’ चित्रपट प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरला. शिवाय, प्रसाद सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. तो त्याचे रील्स व फोटोज त्याच्या चाहत्यांसह नेहमी शेअर करतो. नुकताच त्याने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये चाहत्यांनी केलेल्या एका कृतीने तो अगदी भारावून गेला होता. (Prasad Oak share a Fan Moment)
प्रसाद सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्या शूटिंगदरम्यान पंढरपूर येथील एक चाहता त्याला भेटायला आला. यावेळी त्या चाहत्याने प्रसादला विठूरायाची मूर्ती भेट देऊन त्याचा सत्कार केला. चाहत्यांच्या या कृतीने प्रसादला भारावून गेला होता. त्याने हा अनुभव त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत सांगितलं आहे. शेअर केलेल्या या फोटोमध्ये प्रसादच्या हातात विठूरायाची मूर्ती दिसत आहेत.
या फोटोसह लिहिलेल्या पोस्टमध्ये तो म्हणाला, “आज अचानक पॅकअपनंतर आमचा वेशभूषाकार संतोष जगताप व्हॅनिटी व्हॅनमध्ये आला आणि म्हणाला, ‘दादा… माझे काही मित्र पंढरपुरातून इथे सांगलीत स्पेशल गाडी करुन फक्त तुला भेटायला आले… त्यांना ५ मिनिटं देशील का?’ मी म्हटलं बोलाव. त्यानंतर नवनाथ गायकवाड आणि त्यांचे २-३ मित्र अशी काही मंडळी आली… आणि काही कळायच्या आत एकाने मला फेटा बांधला, दुसऱ्याने गळ्यात हार घातला, आणि तिसऱ्याने म्हणजे नवनाथने ही सुंदर मूर्ती माझ्या हातात ठेवली आणि सगळे जाऊ लागले. मी म्हणालो, ‘एवढ्याच साठी आला होतात?’ त्यावर ते म्हणाले, ‘हो दादा… वाटलं ही मूर्ती तुमच्या हातात द्यावी बास..’. अन् सगळे क्षणार्धात मला आभार मानण्याची संधीही न देता निघून गेले.”
हे देखील वाचा – नागराज मंजुळेंच्या सुपरहिट ‘नाळ’ चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार, चित्रपटाच्या टीझरने वेधलं लक्ष
पुढे तो म्हणाला, “कधी कधी मला खरंच कळत नाही की, या अशा निर्लेप, निखळ, निरपेक्ष प्रेमाचं उतराई कसं व्हायचं? या जिव्हाळ्याचं, या आपुलकीचं काय करायचं? सध्या चालू असलेलं काम म्हणजे खरोखरच एक ‘अवघड वाट’ आहे. पुढच्या कामांचंही मनात दडपण आहे. अशा वेळी कुठं चुकलो तर? म्हणून मला ‘संगत’ द्यायला आला असावा की काय तो? या अशाच भांबावलेल्या आणि भारावलेल्या अवस्थेत मी त्या मूर्तीकडे पाहिले आणि त्याच क्षणी मला ‘धर्मवीर’मधील आमच्या संगीताताई बर्वे यांनी लिहिलेले शब्द आठवले…
संगतीनं ओलांडला अवघड घाट
चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट
तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेटसुख-दुःख एका मेका वाटलं वाटलं
भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल…!!!”
हे देखील वाचा – “तुझ्या मिठीत…”, पाठकबाईंची नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त रोमँटिक पोस्ट, म्हणाली, “माझ्या आयुष्यातील…”
प्रसादची ही पोस्ट नेटकऱ्यांना प्रचंड भावली आहे. त्याचबरोबर सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी कमेंट करत अभिनेत्याचे कौतुक केले. दरम्यान, प्रसाद सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणावर आधारित ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाच्या शूटमध्ये व्यग्र आहे. तसेच, त्याच्याकडे ‘धर्मवीर २’, ‘जिलेबी’, ‘वडापाव’ असे अनेक चित्रपट असून ते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.