गेले काही दिवस ज्या पुरस्कार सोहळ्याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. तो मानाचा समजला जाणारा ‘झी नाट्य गौरव २०२४’ हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. काल (७ एप्रिल) रोजी या पुरस्कार सोहळ्याचे प्रक्षेपण झाले. यंदाच्या या ‘झी नाट्य गौरव २०२४’ या सोहळ्यामध्ये सिनेसृष्टीसह नाट्यक्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार मंडळींनी सहभाग दर्शविला. प्रशांत दामले, मोहन जोशी, संजय मोने, वंदना गुप्ते, कविता मेढेकर, सुकन्या मोने, प्रिया बापट, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, अमृता देशमुख, वैभव मांगले, पल्लवी अजय, आशुतोष गोखले यांसारख्या अनेक कलाकारांची उपस्थिती पाहायला मिळाली.
यंदाच्या ‘झी नाट्य गौरव २०२४’ पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री अमृता देशमुखला ‘नियम व अटी लागू’ या व्यावसायिक नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी तिच्या सोशल मीडियावर हा पुरस्कार मिळाल्यानिमित्त आनंद व्यक्त केला होता. अमृताच्या नवऱ्याला म्हणजेच अभिनेता प्रसाद जवादेनेही हा खास पोस्टद्वारे अमृताला हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त केला होता. अशातच आता प्रसादने पुन्हा एकदा त्याच्या बायकोसाठी खास व्हिडीओ शेअर करत गौरवोद्गार काढले आहेत.
प्रसादने अमृतासाठी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “अमृता आणि ‘नियम व अटी लागू’ या जोडगोळीचा प्रवास मी खुप सुरवातीपासून आणि अगदी जवळून पाहिला आहे. तालमीच्या वेळेस घर शोधण्यापासून ते प्रत्येक दौऱ्यावर जाताना घर सोडतानाचा क्षण अगदी नीट लक्षात आहे. माझी बायको उत्तम अभिनेत्री असली पाहिजे असं एका मुलाखतीत मी गंमतीने बोललो होतो आणि अमृताने ते फारच मनावर घेतलं.”
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “अमृताला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा जो पुरस्कार मिळाला आहे, तो तिच्या उत्तम अभिनयाबरोबरच शिस्त, चिकाटी व प्रामाणिकपणाबद्दल मिळाला आहे. अमृता मला तुझा खरच अभिमान आहे, तू माझ्या डोळ्यात अश्रू आणलेस, हा पुरस्काराचे आमच्या आयुष्यात नेहमीच एक विशेष स्थान राहील”. दरम्यान, प्रसादने शेअर केलेल्या या खास पोस्टला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच तिचे कौतुक करत तिला अभिनंदनही म्हटलं आहे.