मराठी कलाकारांचा लग्नसोहळा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. प्रथमेश परब पाठोपाठ आता आणखी एक जोडपं विवाहबंधनात अडकलं आहे. तितीक्षा तावडे व सिद्धार्त बोडके यांचा शाही विवाहसोहळा नुकताच पार पडला. या दोघांच्याही लग्न सोहळ्याला मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. आता आणखी एक मराठी अभिनेत्री विवाहबंधनात अडकणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. पूजाच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. संगीत, मेहंदी कार्यक्रमानंतर आता तिच्या हळदी कार्यक्रमाची चर्चा सुरु झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पूजा इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे लग्नापूर्वीच्या विधींचे फोटो शेअर करत आहे. व्याही भोजनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पूजाने तिच्या संगीत सोहळ्याची तयारी केली. रविवारी (२५ फेब्रुवारी) पूजा व सिद्धेश चव्हाणचा संगीत सोहळ्याचा कार्यक्रम अगदी थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमामध्ये पूजाच्या आई-वडिलांसह तिच्या सासूबाईंनीही धमाल डान्स केला. तर पूजाची बहीण रुचीराच्या डान्सने विशेष लक्ष वेधून घेतलं.
आणखी वाचा – Video : असाही लग्नसोहळा! नवऱ्याने वरमाला घालताच भर मंडपात रडू लागली तितीक्षा तावडे, उपस्थितही बघत बसले अन्…
पूजाच्या संगीत सोहळ्याला प्रार्थना बेहरे, तिचा पती अभिषेक जावकर, भूषण प्रधान, वैभव तत्त्ववादी, भार्गवी चिरमुले यांसारख्या कलाकारांनी हजेरी लावली होती. आता पूजाच्या हळदीला सुरुवात झाली आहे. पूजाच्या बहिणीने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे हळदी कार्यक्रमाचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये लग्नासाठी मंडप सजलेला दिसत आहे. तसेच पाहुणे मंडळींच्या पाहुणचारासाठी जोरदार तयारी करण्यात आलेली दिसत आहे.
पूजाच्या बहिणीने संपूर्ण कार्यक्रमाची झलक दाखवली आहे. तसेच हळदीसाठी सगळ्यांनी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले असल्याचे दिसत आहे. काही वेळापूर्वीच पूजाच्या मेहंदी कार्यक्रमाचे फोटो समोर आले होते. या फोटोंमध्ये तिचा लूक अगदी उठून दिसत होता. तसेच तिने परिधान केलेल्या लेहंग्याने विशेष लक्ष वेधून घेतलं. आता लवकरच तिला सिद्धेशच्या नावाची हळद लागणार आहे. एका पंचतारांकित हॉटेलच्या टॉपला हा कार्यक्रम होणार असल्याचं व्हिडीओमधून दिसून येत आहे.