Sajana Marathi Movie : प्रेमाच्या गंधाने सुरु झालेली एक सुंदर गोष्ट, जेव्हा नात्यांमध्ये गुंतते तेव्हा त्या निरागस प्रेमातूनच जन्म होतो एक आगीत भडकणारा सुड. मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन येणारा चित्रपट म्हणजे ‘सजना’. चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने प्रेम, नातं यांचा गुंता अधिकच वाढवला आहे. विशेष म्हणजे ट्रेलरचे प्रक्षेपण हा एक खास प्रसंग ठरला आहे. या ट्रेलरचे थेट प्रक्षेपण मराठीतील विविध मनोरंजनशी संबंधित चॅनेलच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीमद्वारे करण्यात आले. म्हणजेच ‘सजना’ चित्रपटाचा ट्रेलर मराठी एंटरटेनमेंट डिजिटल मीडिया नेटवर्कवर एकत्रितपणे थेट प्रक्षेपित करण्यात आला.
‘सजना’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सुंदर प्रेमाची सुरुवात, विचारसरणीतील अंतर, भावनिक संघर्ष, सुडाची भावना आणि प्रत्येक वळणावर धक्कादायक ट्विस्ट असल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपटातून एक नवीकोरी जोडी रसिकांच्या भेटीस येत आहे. शशिकांत धोत्रे आर्ट निर्मित आणि प्रस्तुत ‘सजना’ सिनेमातील या ट्रेलरमध्ये नायक आणि नायिकेच्या आयुष्यात अनेक संघर्ष आलेले पाहायला मिळत आहेत. मैत्रीचं प्रेमात रूपांतर, प्रेमाचं तुटणं आणि त्यातून उगम पावणारा सुड हे सगळं अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे. प्रत्येक वळणावर गोष्ट बदलते, पात्रांचे रंग बदलतात आणि कथा एका अनपेक्षित शेवटाकडे प्रवास करते. शेवट अकल्पनीय आहे.
जेव्हा प्रेक्षकांना वाटतं की सर्व काही संपलं, तेव्हाच ही कथा एक अनपेक्षित वळण घेते, ज्याने प्रत्येक प्रेक्षकाचं मन सुन्न होतं. त्यामुळे एक विलक्षण सिनेमॅटिक अनुभव सिनेप्रेमींना या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. ‘सजना’ या चित्रपटाची निर्मिती स्वतः शशिकांत धोत्रे यांनी केली आहे तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन सुद्धा शशिकांत धोत्रे यांचेच आहे.
चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी रणजित माने यांनी सांभाळली आहे. तर संगीत ओंकारस्वरुप यांचं असून सिनेमातील रोमँटिक गाणी भुंगा म्युझिकच्या बॅनरखाली बनली आहेत. ‘सजना’ हा सिनेमा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात २७ जून २०२५ पासून प्रदर्शित होणार आहे.





