Ashok Saraf : आजवर अनेक मराठी मालिका, चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते म्हणजे अशोक सराफ. अशोक सराफ यांनी गेली अनेक दशक रसिकांचे खळखळून मनोरंजन केले आहे. अभिनय सृष्टीतील उत्तम कामगिरीमुळे त्यांना आता पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अशोक सराफांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं. २७ मे रोजी राष्ट्रपती भवनात हा कार्यक्रम पार पडला. अशोक सराफ यांच्या प्रत्येक चाहत्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण होता. अशोक सराफही या पुरस्कारानंतर भावुक झालेले पाहायला मिळाले. सर्वच क्षेत्रातून अशोक यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.
अशोक सराफ त्यांच्या कुटुंबासह दिल्ली येथे पुरस्कार सोहळ्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना विमानप्रवासादरम्यान एक सुंदर असा क्षण त्यांना अनुभवता आला. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची भाची अदिती परांजपे ही पायलट आहे. आणि अशोक सराफ पद्मश्री पुरस्कार घेऊन परतत असताना त्या विमानाची पायलट ही अदिती होती. अदितीने तिच्या काकांसाठी विमानात उद्घोषणा केली. आणि तिच्या या कृतीने अनेकांची मन जिंकली. अदितीबद्दल आता अशोक सराफ यांनीही केलेलं भाष्य लक्षवेधी ठरतंय.
पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर अशोक सराफ यांनी ‘इट्स मज्जा’ या युट्युब चॅनेलला Exclusive मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी अदितीबाबतही भाष्य केलं. ते म्हणाले, “ती मुलगी ग्रेट आहे. कमाल आहे. आज ती कॅप्टन आहे. इतक्या लहान वयात ती कॅप्टन झाली आहे. मी ज्यादिवशी ज्यावेळेला दिल्लीहून मुंबईला येण्यास प्रवास करत होतो तेव्हा खरंतर तिची कामाची वेळ नव्हती. दुसऱ्या मार्गावर उड्डाण करणार होती. पण तिने माझ्यासाठी हा दिल्ली-मुंबई मार्ग मागून घेतला. माझ्या काकांना मला स्वतःच आणायचं आहे हा हट्ट तिने धरला. आणि यासाठी ती भांडली. आणि अर्थात हे कौतुकास्पद आहे. आणि ही गोष्ट कायम मनात बसून राहणारी आहे”.
अदिती आणि अशोक सराफ यांचा विमानप्रवासादरम्यानचा व्हिडीओ व्हायरल झाला. यांत अदिती असं म्हणताना दिसतेय की, “नमस्कार! मी फ्लाइट कॅप्टन अदिती परांजपे. दिल्ली टू मुंबई या विमान प्रवासात तुमचे सर्वांचे स्वागत. आजचा प्रवास माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण माझे काका अशोक सराफ हे माझ्याबरोबर या विमानातून प्रवास करणार आहेत. ज्यांचा नुकताच पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आले आहे. याचा मला अभिमान वाटतो. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक करावे”.