‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. सध्या मालिकेत एकीकडे किर्लोस्कर कंपनीच्या ब्रँडच्या प्रमोशनसाठी आदित्य, पारू वाखरवडीला गेलेले असतात. तर इकडे अहिल्यादेवी व श्रीकांत त्यांच्या कामातुन थोडासा वेळ काढत एकमेकांना वेळ देण्यासाठी आणि पूर्वीच्या त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी फिरायला जातात. अहिल्यादेवी व श्रीकांत यावेळी जाताना सुरक्षारक्षकांना बरोबर घेऊन जात नाहीत. दोघेही एकमेकांसह एकांतात वेळ घालवत असतात. तेव्हा ते पाणीपुरी खायला जातात. (Paaru Serial New Promo)
मालिकेच्या नव्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यांत अहिल्यादेवी व श्रीकांत बोलत असतात तेव्हा तिथे एक गाडी येते. आणि तो ड्रायव्हर श्रीकांतला पत्ता विचारु लागतो. पत्ता सांगायला तो पुढे जातो, तेव्हढ्यात एक माणूस श्रीकांतला गाडीत ढकलतो आणि गाडीतून घेऊन जातो. अहिल्यादेवीचं लक्ष जात तोवर गाडी पुढे निघून जाते. तितक्यात अहिल्यादेवीला सूर्यकांत कदमचा फोन येतो. सूर्यकांत कदमची माणसं अहिल्या व श्रीकांतवर घरातून निघाल्यापासून लक्ष ठेवून असतात.
संधी साधत ते श्रीकांतला किडनॅप करतात. सूर्यकांत कदम अहिल्याला फोन करतो आणि बोलतो की, अहिल्याताई या बारा तासात सगळ्या शेतकऱ्यांच्या सही असलेला कागद आणि ती फाईल माझ्याकडे घेऊन या”. त्यावेळी श्रीकांत सूर्यकांत कदमच्या तावडीत असतो. मालिकेच्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की, दुसऱ्या दिवशी अहिल्यादेवी फाईल घेऊन सूर्यकांत कदमकडे जातात.
मालिकेत सूर्यकांत कदमची एंट्री झाली असून ही भूमिका अभिनेते भरत जाधव साकारत आहेत. अहिल्यादेवींनी दत्तक घेतलेल्या गावावर सूर्यकांत कदमला ताबा मिळवायचा असतो. आता हा ताबा मिळवण्यासाठी सूर्यकांत नवी चाल आखत श्रीकांतला किडनॅप करतो. आता अहिल्यादेवींना सूर्यकांत कदम भिडणार का?, अहिल्यादेवी सुर्यकांतला प्रत्युत्तर देणार का?, हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.