Paaru Serial Sharayu Sonawane : मालिका, मालिकांमधील कलाकार नेहमीच रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करतात. आजवर अशा अनेक मालिका आहेत ज्यांनी प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवलं आहे. यापैकी एक मालिका म्हणजे झी मराठी वाहिनीवरील पारू. गेले अनेक दिवस ही मालिका प्रेक्षकांची मन जिंकतेय. गावरान, हुशार, चलाख, तितकीच शांत, प्रेमळ, रौद्र आणि लोभी अशा पारूने साऱ्यांची मन जिंकली. या भूमिकेतून अभिनेत्री शरयू सोनावणेने साऱ्यांचं लक्ष वेधलं. पारूमध्ये पारूचे किर्लोस्कर कुटुंबाप्रती असलेलं प्रेम पाहायला मिळतंय. त्यांच्यासाठीची काळजी, त्यांच्यासाठी लढण्याची दाखविण्यात आलेली तयारी हे सारं काही मालिकेत पाहणं रंजक ठरतंय.
सोशल मीडियावरही पारू म्हणजेच शरयू सोनावणे बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. प्रेमळ, शांत असणाऱ्या या पारूने आता मात्र तिच्याच सहकलाकाराला दिलेल्या उत्तराने ती चर्चेत आली आहे. हा सहकलाकार म्हणजे पारू मालिकेतील अजय. म्हणजे अभिनेता सचिन देशपांडे. या मालिकेत सुरुवातीला पारू व अजय यांचं लग्न ठरलं होतं, मात्र अजय हा चुकीचा असल्याचा खरा चेहरा सर्वांसमोर आला आणि त्याचा पर्दाफाश झाला.
मालिकेत अजय व पारू यांच्या विरोधाभास असला तरी ऑफस्क्रीन त्यांचे बॉण्ड खूपच खास आहे. अशातच सचिनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मालिकेतील कलाकारांचे फोटो पोस्ट केले आहेत. यांत पारूबरोबरचा फोटो शेअर करत त्याने तिला चिडवलं आहे. सचिनने पारूबरोबरचा फोटो शेअर करत ‘वाकडतोंडी’ असं कॅप्शन दिलं आहे. ही कमेंट पाहून पारूने म्हणजेच शरयूनेही सचिनला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं आहे. शरयूने शेअर केलेल्या पोस्टवर “स्वतःचं किती कौतुक करशील?”, असं म्हटलं आहे.

पारू मालिकेत काही दिवसांपूर्वीच किर्लोस्कर कुटुंबावर संकट आले होते. प्रीतमवर एका मुलीने आरोप लावल्याचे पाहायला मिळाले. मात्र, अहिल्यादेवी किर्लोस्करने त्या मुलीचे आरोप उघडकीस आणत आपल्या मुलाला निर्दोष सिद्ध केले. आता मात्र पारूच्या जीवावर संकट आल्याचे पाहायला मिळत आहे. आता या मालिकेत पारूच्या जीवावरचे संकट कसे टळणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.