Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत एका मागोमाग एक ट्विस्ट येत असतानाच मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, दामिनीने नवा कट रचलेला असतो. दामिनी सतत अहिल्यादेवींच्या मागे लागून पारू व आदित्य बद्दल काही ना काही सांगत असते. शिवाय सावित्रीला खूप मोठं गुपित माहीत असल्याचंही ती सांगते. यावर अहिल्यादेवी सावित्रीला ताबडतोब बोलावून घेतात आणि विचारतात की, असं कोणतं गुपित आहे जे तू आणि पारूमध्येच आहे. ते तू मलाही सांग. तर दामिनी ही सावित्रीला खूप फोर्स करते मात्र सावित्री त्या वेळेला काहीच बोलत नाही. तितक्यात सावित्रीला असा भास होतो की, तिने सगळं काही अहिल्यादेवींना सांगितलं आहे, आणि याची शिक्षा पारूला भोगावी लागली आहे.
सावित्रीला भास होतो की, ती अहिल्यादेवींना असं बोलत आहे की, तुम्ही अनुष्काला या घराची सून म्हणून स्वीकारु शकत नाही कारण पारू या घराची थोरली सून आहे आणि पारूचं आदित्य बाबांचं बरोबर लग्न झालं आहे. तिच्या गळ्यात आदित्य बाबांच्या नावाचं मंगळसूत्र आहे. त्यामुळे या घराची सून पारूच आहे. हे ऐकताच अहिल्यादेवींचा राग अनावर होतो आणि अहिल्यादेवी सावित्रीच्या सणसणीत कानाखाली लगावतात आणि म्हणतात की, या जागी तू नसतीस आणि दुसरं कोणी असतं तर मी हे सहनच केलं नसतं आणि काय केलं असतं याची कल्पनाही नाही. यावर श्रीकांत अहिल्यादेवींना शांत करतो आणि सांगतो की, एक वेळ हे दामिनीने सांगितलं असतं तर आपण त्याकडे दुर्लक्ष केलं असतं पण हे सावित्री सांगतेय म्हणजे नक्कीच काहीतरी यांत तथ्य असणार असं म्हणतात.
आणखी वाचा – धर्म बदलण्यासाठी एजाज खानची पवित्रा पुनियावर जबरदस्ती?, अभिनेत्री म्हणाली, “मुस्लिम मुलीने हिंदू घरात…”
अहिल्यादेवी पारू व आदित्यला ताबडतोब बोलवून घेतात आणि पारूला जाब विचारतात. यावर पारू त्यांची माफी मागते तेव्हा अहिल्यादेवी पारूच्या कानाखाली मारतात. आणि पारूला घराबाहेर काढतात. अहिल्यादेवी सावित्रीला आवाज देऊ लागतात तितक्यात ती भानावर येते आणि त्याच वेळेला तिला पारूचा फोन येतो. सारवा सारव करत सावित्री कशीबशी तिथून पळ काढते आणि किचनमध्ये जाऊन पारुबरोबर बोलते. तेव्हा पारूला कळतं की सगळं काही सुरळीत आहे आणि तिने कोणालाही काहीच सांगितलेलं नाही. त्यानंतर इकडे अनुष्का नानूला दारूची बॉटल देते आणि दोन ग्लास मध्ये दारू मिक्स करायला सांगते. अनुष्काच्या सांगण्याप्रमाणे कोल्ड्रिंक्समध्ये तो दारू मिक्स करतो. मात्र त्याला विसरभोळापणा असल्याने तो विसरुन जातो की, नेमकी त्याने कोणत्या ग्लासामध्ये दारू मिक्स केली आहे.
त्यानंतर तो कोल्डड्रिंकचे ग्लास घेऊन बाहेर यायला निघतो. तर इकडे पारू तिच्या वडिलांना फोन करायला म्हणून जात असते तेव्हा अनुष्का तिला थांबवते आणि सांगते की, आज तू सुद्धा आम्हाला जॉईन हो आणि आपण गप्पा मारू, असं म्हणून ते तिघही बसतात. त्याच वेळेला नानू कोल्ड्रिंगचे ग्लास घेऊन येतो आणि अनुष्काला इशारा देत सर्वांना ग्लास सर्व्ह करु लागतो. आता मालिकेच्या पुढील भागात नेमकं काय होणार हे पाहणं रंजक ठरेल.