१९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटाची क्रेझ आजही कायम आहे. इतकी वर्षे होऊनही आजही हा चित्रपट पाहताना पुन्हा पुन्हा नव्याने पाहत असल्याचं वाटतं. ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील सुवर्णपान ठरला. कित्येक वेळा चित्रपट पाहिला, त्यातील डायलॉग कितीही पाठ असेल, तरी आजही घराघरात हा चित्रपट त्याच आवडीने पाहिला जातो. अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं निव्वळ मनोरंजन करणाऱ्या, आजही खळखळून हसवणाऱ्या या चित्रपटातील धनंजय माने इथेच राहतात का? हा डायलॉग तुफान गाजला. (dhananjay mane ithech rahtat ka little fan)
‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटातील कित्येक डायलॉग आजही चाहत्यांना तोंडपाठ आहेत, पण तरी हा चित्रपट प्रत्येकवेळी खळखळून हसवतो. चित्रपटातील ‘धनंजय माने इथेच राहतात का?’ या डायलॉगचा मोठा चाहतावर्ग आहे. अबालवृद्ध या चित्रपटावर आजही तितकेच प्रेम करतात आणि यातील प्रत्येक डायलॉग म्हणून दाखवतात. अशातच निवेदिता सराफ यांनी नुकतंच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक अडीच वर्षांची चिमुकली मुलगी ‘अशी ही बनवाबनवी’मधील खास डायलॉग म्हणत आहे.
आणखी वाचा – सर्वोत्कृष्ट नायक पुरस्कार मिळताच प्रसादसाठी अमृताची खास पोस्ट, म्हणाली, “‘पारु’ मालिकेमधला आदित्य बघताना…”
चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ज्याप्रकारे दरवाज्यावर हात मारत “धनंजय माने इथेच राहतात का?” हा संवाद म्हणून दाखवला होता. अगदी तसंच ही चिमकुली या व्हिडीओमध्ये करताना पाहायला मिळत आहे. निवेदिता सराफ यांनी चिमुकलीचा हा खास व्हिडीओ शेअर करत खाली कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, “मृण्मयी नाडकर्णी वय वर्षे २.५. ‘अशी ही बनवाबनवी’ची आणि धनंजय माने यांची सगळ्यात छोटी चाहती” असं म्हटलं आहे.
दरम्यान, निवेदिता यांनी शेअर केलेला हा चिमुकलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी या लहान मुलीचे कौतुकही केलं आहे. निवेदिता या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सोशल मीडियावर ते त्यांच्या कामाबरोबरच काही फोटो व व्हिडीओही शेअर करत असतात. तसंच अनेक जुने किस्से, आठवणीही शेअर करत असतात. अशातच त्यांनी ‘अशी ही बनवाबनवी’च्या निमित्ताने एका लहान मुलीचा व्हिडीओ शेअर केला आहे.