बॉलिवूडमध्ये काम करत असताना बऱ्याच कलाकारांना विविध अनुभव येतात. काही कलाकार खुलेपणाने बॉलिवूडमधील सत्य परिस्थितीबाबत व्यक्त होतात. चित्रपटसृष्टीमधील लैंगिक शोषण असो वा काम मिळू नये म्हणून त्रास देणं असो असे कित्येक प्रकार कलाकारांबरोबर घडतात. मात्र पुढे येऊन याविरोधात आवाज उठवणं फार कमी जणांना जमतं. अर्थात काही बोललो तर कामही मिळणार नाही ही भीतीही अनेक कलाकारांमध्ये असते. मात्र नवाजुद्दीन सिद्दीकी याला अपवाद आहे. नवाजुद्दीन त्याचं मत बिनधास्तरितीने मांडतो. आताही त्याने बॉलिवूडबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत. याचीच सध्या चर्चा सुरु आहे. (Nawazuddin Siddiqui On Bollywood)
नवाजुद्दीन सध्या त्याच्या आगामी ‘कोस्टाओ’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. याच चित्रपटाच्यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत त्याने अनेक विषयांवर भाष्य केलं. तेव्हा तो बॉलिवूडबाबत बोलत होता. नवाजुद्दीन म्हणाला, “इतर ठिकाणी जशी दिवाळखोरी होते तसंच इथे ठरवून भ्रष्टाचार होतो. सुरुवातीपासूनच बॉलिवूड इंडस्ट्री चोर आहे. कथाही चोरी केलेल्याच. तीन ते चार सिक्वेल बनवले जातात. क्रिएटीव्हीटी तर खूपच गरिब आहे. सुरुवातीपासूनच आपली इंडस्ट्री चोरी करत आहे. आपण गाणी, कथा चोरल्या”.
पुढे तो म्हणाला, “आता जे चोर असतात तेच क्रिएटिव्ह कसे असतील?. आपण साऊथमधून चोरी केली. तर कधी इकडून तर कधी तिकडून. काही चित्रपट जे हिट झाले, त्यामधील सीनही चोरी केलेलेच आहेत. पण याकडे अगदी साध्या पद्धतीने बघितलं जातं. चोरी केली तर काय झालं? असा प्रश्न असतो. इंडस्ट्रीमध्ये एकच गोष्ट पाच वर्ष दाखवली जाते. जेव्हा लोकांना कंटाळा येऊ लागतो तेव्हा मग ती गोष्ट थांबवली जाते”.
आणखी वाचा – Video : ‘इंडियन आयडल १२’चा विजेता पवनदीप राजनचा भीषण अपघात, गायकाची रुग्णालयातील अवस्था पाहून ओळखणंही कठीण
“इथे एकमेकांप्रती असणारी असुरक्षितता खूप वाढली आहे. एक कथा जर चांगली चालली तर तिच तिच पुढे चालवली जाते. त्याचा अक्षरशः किस काढला जातो”. नवाजुद्दीनने अगदी बेधडकपणे बॉलिवूडमधील सत्य परिस्थितीबाबत भाष्य केलं. मात्र त्याने आताच्या इंडस्ट्रीची खरी परिस्थिती सगळ्यांसमोर आणली. अनेकदा बॉलिवूडमध्ये रिमेक होतात यावरुन चर्चा रंगतात. तेच अगदी योग्य रितीने नवाजुद्दीने मांडलं. आता यावर काही प्रश्न निर्माण होणार का? हे पाहावं लागेल.