रस्ते अपघातांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. ड्रायव्हरला डुलकी लागली, अती वेग, गाडीवर ताबा सुटणं अशा कित्येक कारणांमुळे रस्ते अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. आता अशीच एक घटना समोर आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर खेड भरणे नाका येथे जगबुडी नदीच्या पुलावरुन किया कार थेट १०० ते १५० फूट खाली कोसळली. या भीषण अपघातात दोन कुटुंबातील एकूण पाच लोकांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र या अपघातामध्ये लेकीला तिच्या वडिलांना शेवटचंही पाहता आलं नाही. नक्की काय घडलं?, अपघात कसा झाला? याची सविस्तर माहिती आता समोर आली आहे. (Mumbai goa highway car accident)
सोमवरी पहाटे जवळपास पाच वाजता हा अपघात घडला असल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर आलं. नालासोपारा भागातील पराडकर कुटुंब आणि मीरा-भाईंदर परिसरातील मोरे कुटुंब देवरुख येथील गावी जात होते. दोन्ही कुटुंबिय रविवारी रात्री गावी जाण्यास घराबाहेर पडले. अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यानंतर दोन्ही कुटुंबियांवर काळ धावून आला. अपघाताची भीषणताही भयावह होती.

जगबुडी नदीच्या पुलावर कार असताना चालकाचा कारवरील ताबा सुटला. दरम्यान कार थेट नदीतच बुडाली. या जीवघेण्या अपघातात मिताली विवेक मोरे (४५), निहार विवेक मोरे (१९), श्रेयस राजेंद्र सावंत (२३), मेधा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर (२२) यांचा मृत्यू झाला. मिताली मोरे यांच्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी दोन्ही कुटुंबिय गावी जात होते. मात्र वडिलांना शेवटचं पाहण्यापूर्वीच मितालीनेही जगाचा निरोप घेतला. दोन्ही कुटुंबातील पाच माणसं एकत्र मरण पावणं हेही अतिशय वेदनादायी ठरलं.
पहाटे अपघात झाल्यानंतर स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तसेच तेथील नागरिकांनीही अपघातस्थळी बचावकार्य करण्यास प्रयत्न केले. नदीत कोसळलेल्या कारला क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं. कारमधील प्रवाशांनाही बाहेर आणलं. जवळपास असलेल्या रुग्णालयात जखमींना नेण्यात आलं. परमेश पराडकर व विवेक मोरे अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.