Kartiki Gaikwad Brother Wedding : सध्या सर्वत्र लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अशातच एका नामवंत संगीत क्षेत्रातील घरी लग्नसमारंभ थाटामाटात उरकला असल्याचं समोर आलं. गायकवाड कुटुंबात सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. सुप्रसिद्ध संगीतकार, गायक कल्याणजी गायकवाड यांच्या घरी नुकताच लग्नसमारंभ पार पडला. त्यांच्या धाकट्या लेकाचा म्हणजेच कौस्तुभ गायकवाडचा शाही विवाहसोहळा १ मे २०२४ रोजी संपन्न झाला. या शाही विवाहसोहळ्यात त्यांची लेक सारेगमप लिटल चॅम्प्स फेम कार्तिकी गायकवाडची हवा पाहायला मिळाली. भावाच्या लग्नात कार्तिकीने खूप धमाल केली असल्याचं तिने शेअर केलेल्या फोटोंवरुन स्पष्ट होत आहे.
कार्तिकीने आजवर तिच्या गायनकलेने रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. कार्तिकी सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असलेली पाहायला मिळते. नेहमीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतचे अनेक अपडेट सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत देते. अशातच कार्तिकीने तिच्या इंस्टाग्रामवर भाऊ कौस्तुभच्या लग्नातील खास लूकचे आणि लग्नविधीचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये कार्तिकीच्या भावाच्या लग्नाचा शाही थाटमाट पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – “नातवंड खेळवण्याच्या वयात…”, गोविंदाच्या अफेअरवर बायकोचं मोठं विधान, म्हणाल्या, “६२ वर्षांचा…”
कार्तिकीने भावाच्या लग्नात करवली बनून खूप मिरवलं. नवऱ्या मुलीलाही मागे टाकेल असा तिचा लक्षवेधी लूक चर्चेत राहिला. लग्नात कार्तिकीने पांढऱ्या रंगाची आणि भगवा काठ असलेली नऊवारी साडी आणि त्यावर हिरव्या रंगाचा डिझाइनर कॉन्ट्रास्ट ब्लाउज परिधान केला होता. डायमंडची ज्वेलरी, वेस्टर्न मंगळसूत्र हातात हिरवा चुडा, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर अशा या कार्तिकीच्या मराठमोळ्या लूकवरुन नजर हटत नव्हती.
कार्तिकीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये नववधू वराने सप्तपदी घेण्याआधी गाठ बांधायला नणंदबाईच पुढे सरसावली. यावेळी ते तिघेही छान हसताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. कार्तिकीबरोबरच तिचा नवरा रोनित पिसे आणि लेकाच्या मॅचिंग कपड्यातील लूकनेही साऱ्यांच्या नजरा वळविल्या. इतकंच नाही तर भावाच्या हळदी समारंभातही कार्तिकीचा मॉडर्न लूक नवऱ्या मुलीच्या लूकला फिका करणारा होता. एकूणच कौस्तुभच्या लग्नात कार्तिकी भाव खाऊन गेली, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.