Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे प्रकरणाबाबत प्रत्येक दिवशी विविध माहिती समोर येत आहे. हगवणे कुटुंबियांनी पैशांच्या हव्यासापोटी सूनेला जिवंतपणेच मरनयातना दिल्या. लग्नात ५१ तोळे सोनं, फॉर्च्युनर तसेच इतर महागड्या वस्तू दिल्या. तरीही वैष्णवीचा छळ सुरुच राहिला. सासू-सासरे, सून, दीर, नणंद यांनी वैष्णवीला अनेकदा मारहाण केली. तिचा मानसिक छळ केला. लग्नाच्या दोन वर्षांत तिला बराच अत्याचार सहन करावा लागला. लेकीचा संसार वाचाव म्हणून कस्पटे कुटुंबियही हगवणेंच्या हाता पाया पडले. मात्र इतकं सगळं करुनही वैष्णवीचा छळ सुरुच राहिला. अखेरीस अवघ्या २३व्या वर्षी वैष्णवीने जगाचा निरोप घेतला. या संपूर्ण प्रकाराबाबत आता कलाक्षेत्रामधून विविध प्रतिक्रिया येत आहेत. (Utkarsh shinde song on vaishnavi hagawane death case)
वैष्णवीने आत्महत्या केली नसून तिला संपवण्यात आलं असा आरोप सातत्याने होत आहे. याच प्रकरणात सासरे राजेंद्र, सासू लता, नणंद करिश्मा यांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आलं आहे. शिवाय राजेंद्र हे अजित पवार गटाचे नेते होते. त्यामुळे राजकारणात सक्रिय असणाऱ्या मंडळींनीच असं वागणं कितपत योग्य आहे? असा प्रश्न केला जात आहे. आता या संपूर्ण गंभीर प्रकाराबाबत उत्कर्ष शिंदेने गाणं गायलं आहे. उत्कर्षने युट्युब चॅनलद्वारे गाणं प्रदर्शित केलं.
उत्कर्ष म्हणाला, “हुंडाबळी हे माझं गाणं आज विजया आनंद म्युझिक युट्युब चॅनलला प्रदर्शित होताच सर्वत्र व्हायरल झालं. समाजात घडणाऱ्या घटनांवर मी भल्या मोठ्या बिग बॉसच्या मंचावर बोललो होतो. आजही बोलतो आणि उद्याही बोलतच राहणार. समाजातल्या गोष्टींना अशाचप्रकारे प्रेक्षकांपुढे घेऊन येणार”. काही तासांमध्येच उत्कर्षच्या या गाण्याला हजारो व्ह्युज मिळाले आहेत. तसेच या गाण्यामधून त्याने वैष्णवीची व्यथा मांडली आहे.
ऐका गाणं
दीराने ओढलं मला, नणंदेने पाडलं मला
सासूने झोडलं मला, कुणी ना सोडलं मला
शेवटी नवऱ्याने हुंडापायी मारलं मला
वयात आल्यावर, बोलणी झाल्यावर
नवी नवरी होऊन मी सासरी गेल्यावर
बोलले शेजारी, लक्ष्मी आली घरी
तुम्ही हो सत्वरी, दृष्ट ही काढा तरी
जाळ्यात पाडलं मला, कपट ना कळलं मला
असे उत्कर्षच्या गाण्याचे बोल आहेत. त्याच्या या गाण्यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. दादा तुम्ही योग्य गाणं बनवलं आहे, तुमचं गाणं ऐकून डोळ्यांत पाणी आलं, दादा खूप मस्त गाणं अशाप्रकारच्या कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत.