स्टार प्रवाहवरील प्रसिद्ध मालिका ‘आई कुठे काय करते?’ ही मालिका खूप लोकप्रिय आहे. पाच वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर आज म्हणजे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अत्यंत रंजक वळणं या मालिकेमध्ये बघायला मिळाली. या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. दरम्यान या मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी आलेली अभिनेत्री आता पुन्हा एकदा मालिकेमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ही अभिनेत्री म्हणजे कौमुदी वलोकर. कौमुदीने या मालिकेत आरोही ही भूमिका साकारली होती. खूप कमी काळात प्रेक्षकांनी तिला अधिक प्रेम दिलं आणि तिच्या भूमिकेला पसंतीदेखील दर्शवली. मालिका संपल्यावर मात्र आता तिच्याबद्दलची एक नवीन अपडेट समोर आली आहे. (kaumudi walokar wedding)
सध्या मनोरंजन क्षेत्रात सर्वत्र लगीन घाई सुरु आहे. मनोरंजन विश्वातील सोनाली गुरव-अभिषेक गांवकर, रेश्मा शिंदे-पवन या दमदार जोड्या लग्नबंधनात अडकल्या. आशातच आता कौमुदीदेखील लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मागील वर्षी आकाश चौकसेबरोबर तिचा साखरपुडा पार पडला होता. त्यांच्या साखरपुड्याचे काही रोमॅंटिक फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता लवकरच ही अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरु आहेत.
काही दिवसांपूर्वी तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर केळवणाचे काही फोटो शेअर केले होते. तिचे नातेवाईक व मित्रमंडळींनी तिच्यासाठी खास केळवण आयोजित केले होते. मात्र कौमुदीच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आली नाही. मात्र सध्या सगळ्यांची लगीनघाई बघता लवकरच ती लग्नबंधनात अडकू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
कौमुदीच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ‘आई कुठे…’ या मालिकेत तिने यशच्या पत्नीची भूमिका साकारली होती. या मालिकेतील अनघा व आरोही जावांची जोडीदेखील अधिक प्रसिद्ध झाली.कौमुदीने याआधी ‘मी वसंतराव’, ‘देवाशपथ’, ‘वायझेड’, ‘शटर’, ‘शाळा’, ‘तुझ्या मनात’ या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.सोशल मीडियावरही तिचे अनेक चाहते आहेत. क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.