पतीच्या दीर्घायुष्यासाठी समस्त महिलावर्ग दरवर्षी सावित्री व्रत करतात. विशेषतः हिंदू धर्मात या सणाला या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा २१ जून रोजी हा वटपौर्णिमेचा सण साजरा करण्यात येणार आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. यंदाची ही वटपौर्णिमा नवविवाहित जोडप्यांसाठी खास असणार आहे. मराठी सिनेविश्वातीलही अनेक जोड्या या लग्नबंधनात अडकलेल्या पाहायला मिळाल्या. या कलाकारांचीही यंदा पहिली वटपौर्णिमा असणार आहे. चला तर मग पाहुयात यंदा कोणत्या कलाकारांची पहिली वटपौर्णिमा आहे. (celebrity vatpornima)
‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेमुळे अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता अजिंक्य ननावरे लग्नबंधनात अडकले. दोघांनी थेट साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली. गेली बरीच वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. याशिवाय ते लग्नापूर्वीही लिव्हइन रिलेशनशिपमध्ये होते. दोघांच्याही लग्नाची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.
‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे ही जोडी घराघरांत पोहोचली. त्यानंतर आमचं ठरलं असं म्हणत त्यांनी प्रेमाची कबुली दिली. डेस्टिनेशन वेडिंग करत या जोडीने अगदी थाटामाटात लग्न केले. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात या जोडीचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला.
‘जीव माझा गुंतला’ फेम अभिनेत्री योगिता चव्हाण व अभिनेता सौरभ चौघुले हे दोघे खऱ्या आयुष्यात एकत्र आले आहेत. ३ मार्च रोजी त्यांनी लग्न केले. त्यांच्या लग्नाच्या फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. कोणतीही पूर्वसूचना न देता ही जोडी लग्नबंधनात अडकली. नुकतंच त्यांनी नवं घरही घेतलं आहे.
अभिनेत्री गौतमी देशपांडेने तिच्या नवऱ्याबरोबरचे मेहंदीचे फोटो शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली. गौतमी स्वानंद तेंडुलकरसह लग्नबंधनात अडकली. गौतमी यंदा लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहे.
नेहमीच चर्चेत असणाऱ्या कपलपैकी एक म्हणजे अमृता देशमुख व प्रसाद जवादे. ‘बिग बॉस ४’मुळे ही जोडी चर्चेत आली. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. त्यावेळी थेट साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्यांनी प्रेमाची कबुली दिली.
बॉलिवूड स्टाईलने लग्न केलेल्या पूजा सावंतच्या लग्नाचीही बरीच चर्चा रंगली. पुजाने ऑस्ट्रेलिया स्थित सिद्धेश चव्हाणशी लग्न केले. सध्या सिद्धेश हा ऑस्ट्रेलियात असून पूजा भारतात आहे. आता पूजा भारतातून सिद्धेशसाठी वटपौर्णिमेची पूजा करणार आहे.