‘अग्निहोत्र’, ‘उंच माझा झोका’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. मालिकाविश्वातून स्पृहाने आपल्या अभिनयाची छाप कायमच प्रेक्षकांच्या मनावर सोडली. मात्र स्पृहाला अधिक लोकप्रियता मिळाली ती तिच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेसाठी. याशिवाय स्पृहा आज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय ती तिच्या स्वभावामुळे. मनमोहक, लाघवी, सुजाण, सुशील अशी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. स्पृहाचा खूप मोठा चाहतावर्गही आहे. स्पृहा तिच्या सोशल मीडियावरून नेहमीच काही ना काही पोस्ट करून चाहत्यांच लक्ष वेधून घेत असते. अशातच नुकताच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. (Spruha Joshi New Movie)
“बाप के बदले नौकरी, नौकरी के बदले बाप? कितना भारी पडेगा ये सौदा फॉर मिश्रा परिवार”, असं कॅप्शन लिहीत स्पृहाने तिच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. लवकरचं स्पृहाचा नवा कोरा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘सब मोह माया है’ असं चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाचा ट्रेलर तिने सोशल मीडियावरून शेअर केला आहे.
वडिलांच्या सरकारी नोकरीसाठी रचलेलं षडयंत्र चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतंय. ‘सब मोह माया है’ चित्रपटात स्पृहाची महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळतेय. बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशीच्या पत्नीच्या भूमिकेत ती पाहायला मिळतेय. तर ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर या चित्रपटात शर्मन जोशीच्या वडिलांच्या आणि स्पृहा जोशीच्या सासऱ्यांच्या भूमिकेत आहेत. स्पृहाच्या या चित्रपटातील भूमिकेचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. तिने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक कलाकार मंडळींनी तिचं अभिनंदन केलं आहे.
स्पृहाने मराठी सिनेसृष्टीत नाव कमावल्यानंतर हिंदी सिनेसृष्टीतही स्वतःच बळकट स्थान निर्माण केलं. ‘क्लास ऑफ ८३’, ‘अटकन चटकन’ या हिंदी चित्रपटात तिने काम केलं आहे. शिवाय ती ‘रंगबाज’ आणि ‘द ऑफिस’ या हिंदी वेबसीरिजमध्येही तिने महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. तर ‘बाबा’, ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’, ‘कॉफी’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटातही काम केलं आहे.