मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. चित्रपट, नाटक, मालिका यांसारख्या माध्यमातून आपल्या अभिनयशैलीने रोहिणी यांनी सिनेसृष्टीत आपलं वर्चस्व निर्माण केलं. गेली अनेक वर्ष त्या अभिनयक्षेत्रात सक्रिय असल्याचं पाहायला मिळत आहे. केवळ मराठीच नव्हेतर हिंदी सिनेसृष्टीतही रोहिणी यांनी त्यांच्या अभिनयाने दबदबा निर्माण केला. जगभरात रोहिणी यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. काल रोहिणी यांचा वाढदिवस होता. रोहिणी यांनी काल त्यांचा ७३वा वाढदिवस साजरा केला. (Rohini Hattangady Surprise Birthday Gift)
अनेक कलाकारांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळाला. वाढदिवसादिवशी रोहिणी यांना विमानप्रवासादरम्यान एक खास सरप्राइज पाहायला मिळालं. विमान प्रवासादरम्यान विमानात एक स्पेशल शुभेच्छा त्यांना देण्यात आल्या. या शुभेच्छांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चारचौघी नाटकाच्या दरम्यान विमानप्रवास करताना त्यांना हे खास सरप्राइज मिळालं.
“आपल्या विमानात एक अशी व्यक्ती आहे जिचा आज वाढदिवस आहे आणि आज ती ७३ वर्षांची झाली आहे. ती एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आहे आणि तिचं नाव रोहिणी आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त टाळ्या वाजवून तिला शुभेच्छा देऊयात”, अशी घोषणा करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. “सरप्राईज सरप्राईज, आमच्या प्रेमळ रोहिणी ताईसाठी सिॲटल ते सॅन होजेच्या विमानात वाढदिवसानिमित्त विशेष घोषणा”, असं कॅप्शन दिलेला हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या पत्नी वत्सला उमप यांचं निधन, अल्पशा आजारामुळे मृत्यूने गाठलं
रोहिणी यांना विमानप्रवासात मिळालेलं हे सरप्राइज पाहून त्यांना खूप आनंद झालेला पाहायला मिळत आहे. यावेळी त्यांनी हात वर करुन नमस्कार करत साऱ्यांचे आभार मानले. रोहिणी हट्टंगडी ब्लॉकबस्टर चित्रपट ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटामुळे चर्चेत आल्या होत्या. शिवाय ‘चारचौघी’ या नाटकातून सध्या त्या रंगमंच गाजवताना दिसत आहेत. या नाटकाला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत.