Leena Bhagwat and Mangesh Kadam children decision : सिनेसृष्टीत अशी अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांनी सहकलाकारासहच संसार मांडला आहे. अशी अनेक उदाहरण आहेत ज्यांनी सहकलाकाराच्या प्रेमात पडून लग्नगाठ बांधली आहे. मराठी सिनेविश्वातील अशीच एक लोकप्रिय जोडी म्हणजे लीना भागवत आणि मंगेश कदम. लीना आणि मंगेश सध्या रंगभूमीवर धुमाकूळ घालत आहेत. मालिकाविश्व आणि रंगभूमीवर पती-पत्नीच्या भूमिकेत त्यांनी विशेष लोकप्रियता मिळवली. मंगेश यांनी लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा तीनही जबाबदाऱ्या पेलवल्या आहेत. तर लीना यांनी आजवर अनेक भूमिकांमधून रसिकांच्या मनावर राज्य केलं. मात्र आता लीना आणि मंगेश एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत.
लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी नुकतीच ‘अनुरूप विवाह संस्था’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी लग्नानंतर मुलं न होऊ देण्याचा मोठा निर्णय घेण्याबाबत भाष्य केलं. लीना भागवत व मंगेश कदम यांच्या लग्नाला १३ वर्ष झाली आहेत. नाटकादरम्यानच दोघांनी एकमेकांना पसंत केलं आणि त्यांचा प्रेमविवाह झाला. नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल लीना म्हणाल्या, “आमच्या लग्राच्या अनुषंगाने काही गोष्टी ठरलेल्या होत्या. त्यातलं एक म्हणजे मूल न होऊ देणं. मूल न होऊ देण्याचा निर्णय हा आम्ही एकमेकांच्या सहमतीनं घेतलेला निर्णय आहे”.
मंगेश कदम याबद्दल पुढे म्हणाले, “आम्ही खूप उशिरा लग्न केलं. त्यामुळे लग्नानंतर जर हिला मूल झालं असतं, तर त्याच्यामध्ये अजून तीन-चार वर्षं तिला काहीच करता आलं नसतं आणि ते फार महत्त्वाचं होतं आणि म्हणून म्हटलं की कशासाठी? तू आणि मी आनंदासाठी एकत्र आलो आहोत. मग तुझा आनंद कशात आहे ते तू कर ना, आपल्याला काहीच हरकत नाही आणि असंही माझं आडनाव काही भोसले वगैरे नाही की, ते पुढे चालत राहिलं पाहिजे कदम आडनाव आहे. हळूहळू जाऊयात पुढे”.
आणखी वाचा – मोठी घोषणा! नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील रिटायरमेंटबाबत नाना पाटेकर व्यक्त, म्हणाले, “त्या खुर्चीला चिकटून…”
लीना पुढे म्हणाल्या, “आमचं आधीपासूनच ठरलेलं आणि पहिली गोष्ट मी म्हटलेलं की, मला आता ब्रेक घ्यायचा नाही आहे. दुसरी गोष्ट आपण आपल्या मुलांना काय देऊ शकणार आहोत. काय पद्धतीचं शिक्षण देऊ शकणार आहोत, काय सुरक्षितता देऊ शकणार आहोत, त्यांना आपण काय पद्धतीचं आयुष्य देऊ शकू? या सगळ्या गोष्टीचा विचार करता, आपण खरंच आता तितके सक्षम आहोत का की, ज्या प्रकारे आपल्या आई-वडिलांनी आपल्याला सगळ्या गोष्टी दिल्या, त्या आपण देऊ शकू का? त्यामुळे आम्ही दोघांनी छान शांतपणे निर्णय घेतला. दोघांचीही त्याला सहमती होती”.





